नांदगाव (वार्ताहर) : १ जून ते ३१ जुलैपर्यंत पावसाळ्यात समुद्रातील मासेमारीस शासनाकडून बंदी असल्याने होड्या किनाऱ्यावर बंद आहेत. त्यामुळे मुरूड मार्केटमध्ये मोठी मासळी येत नाही. आजूबाजूचा खाडी पट्टा, नदी, उघडी किंवा खाजण भागामधील छोट्या मासळीवरच मदार दिसून येत आहे. राजपुरी, खामदे परिसरात खाडीतील छोट्या होडक्यांतून उथळ पाण्यात मासेमारी चालते. गरीब मच्छीमार अशी मासेमारी आणि विक्री करून पोटापाण्याची सोय करण्यासाठी धडपडताना दिसून येतात. पारंपरिक प्रथेप्रमाणे नारळी पौर्णिमेनंतर मोठ्या मासेमारीसाठी मच्छीमार समुद्रात जात असतात.
मुरूड येथील सागरकन्या सहकारी मच्छीमार सोसायटीचे व्हॉइस चेअरमन तथा ज्येष्ठ मच्छीमार मनोहर मकू यांनी गुरुवारी बोलताना सांगितले की, मुरूड मार्केटमध्ये मासळी येत नसल्याने वर्दळ कमी असली तरी खाडीपट्यातील मासळी अधून मधून मुरूड शहर आणि मार्केटमध्ये काही प्रमाणात येत असते. त्यावरच खवय्यांना समाधान १५ ऑगस्टपर्यंत तरी मानावे लागणार आहे. येथे पावसाळ्यात खऱ्या अर्थाने नारळी पौर्णिमेनंतरच मोठी मासेमारी सुरू होत असते. त्यानंतर समुद्र शांत होतो अशी मच्छीमारांची श्रद्धा आहे अशी माहिती मनोहर मकू यांनी दिली.मुरूड तालुक्यात राजपुरी, मजगाव, नांदगाव, एकदरा, खामदे आणि अन्य काही गावाजवळ छोटी मासेमारी पावसातदेखील सुरू असते.
पावसाळ्यात समुद्रात मासेमारी बंदी असल्याने काही मच्छीमार उदरनिर्वाहासाठी खाडी पट्यातील मासेमारी कडे हमखास वळतात. पाग, हात घोलवा, मोठा घोलवा, कारा, पेरा, बोक्षी, गळ पद्धत अथवा जाळी घेऊन अशी मासेमारी करतात.या मासेमारीमधून घरातील एक वेळचे भागते. उर्वरित मासळीची ते विक्री करतात. अशा मासेमारीतून खेकडे, पालु, बोईट, छोटे जिताडे, काळी खाजणी कोलंबी, शिंगट्या, आंबाड, कोत्या किंवा कधी कधी छोट्या घोळी, छोटे बोंबील देखील मिळतात, अशी माहिती मनोहर मकू यांनी दिली. खाजण भागात भरतीला मोठा घोलवा सारखी जाळी लावून ओहटीला जाळी काढून मिळालेली मासळी एकत्रित जमा केली जाते. खाजणी अथवा खाडीतील मासळी अतिशय चविष्ठ असते. येथे कुठेही अजिबात बर्फ वापरला जात नाही. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या किनारपट्टीवरील खाडी पट्यात पावसाळ्यात अशाच प्रकारे मासेमारीची पूर्वापार पद्धती असल्याची माहिती एकदरा गावचे महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष तथा मुरूड तालुका मच्छीमार कृती समिती अध्यक्ष पांडुरंग आगरकर, यांनी दिली.