
दापोली (प्रतिनिधी) : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची सहाजणांची टीम मुरुडमधल्या साई रिसॉर्टवर गुरुवारी दिवसभर पाहणी करण्यासाठी दाखल झाली होती. या टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहे. पर्यावरणाच्या हानीची आतापर्यंत काय कारवाई झाली? याची या टीमकडून चौकशी सुरू आहे. सहाजणांच्या टीमकडून ही चौकशी सुरू आहे.
गुरुवारी मुरुड येथील साई रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊन या टीमने पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांत, तहसीलदार, सर्कल, तलाठी हे महसूलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टकडून सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी अनेक आरोप सोमय्या यांनी केले आहेत. ही टीम साई रिसॉर्टप्रमाणे सी कोच रिसॉर्टचीदेखील पाहणी करतेय, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली.
सायंकाळी उशिरा ही टीम दापोली प्रांताधिकारी कार्यालयात दाखल झाली होती. माहिती घेण्याचे काम संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, यापूर्वी अनेकदा अनिल परब यांनी सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपला साई रिसॉर्टशी कोणताही संबंध नाही, असे यापूर्वी स्पष्ट केले आहे.