गुवाहाटी : केसरकर भूमिका मांडतात, माहिती देतात. आम्ही शिवसेनेला पुढे नेतोय, पुढचं पाऊल लवकरच सांगणार, येथे सगळं नीट आहे. आमच्या संपर्कात आहेत वगैरे जे काही बोलत आहेत त्यांनी नावं सांगावीत, असे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान दिले आहे.
ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही भूमिका घेऊन आलो आहोत आणि सर्वजण स्वेच्छेने आलेले आहेत, असे रॅडिसन हॉटेलबाहेरुन एकनाथ शिंदे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आज बोलले.
आमचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सकाळीच भूमिका मांडली. शिवसेना आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून आम्ही गुवाहाटी येथे आलो आहे. येथे आम्ही ५० लोक आलो आहोत. यात ४० आमदार आहेत. प्रत्येकजण आपल्या मर्जीने आलेला आहे आणि सर्वजण खूश आहेत, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली आहे. आता या सगळ्या राजकीय गोंधळात भाजपाची थेट एन्ट्री होताना दिसत आहे.