Monday, April 21, 2025
Homeदेशजैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अमाप संधी : पंतप्रधान

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अमाप संधी : पंतप्रधान

नवी दिल्ली, (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे आयोजित केलेल्या जैवतंत्रज्ञान (बायोटेक) स्टार्टअप एक्स्पो-२०२२ चे उदघाटन झाले. त्यांच्या हस्ते जैवतंत्रज्ञान उत्पादनांच्या ई पोर्टलचे लोकार्पणही झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, डॉ जितेंद्र सिंग, बायोटेक क्षेत्रातील तज्ञ आणि भागधारक, लघू आणि मध्यम उद्योजक तसेच गुंतवणूकदार उपस्थित होते.

गेल्या आठ वर्षात भारताच्या जैव अर्थव्यवस्थेत आठ पटींनी वाढ झाली असून १० अब्ज अमेरिकी डॉलर्स वरून ८० अब्ज डॉलर्स वृद्धीची नोंद झाली आहे, जैवतंत्रज्ञानातील जागतिक परिसंस्थेत अग्रणी दहा राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश होण्याचा दिवस आता फार दूर नाही, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशात जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासात योगदान दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेचा बीआयआरएसी चा गौरवपूर्ण उल्लेख केला. देश सध्या अमृत काळाच्या युगात असून निरनिराळे संकल्प करत असताना देशाच्या विकासात जैवतंत्रज्ञान उद्योगाची भूमिका अतिशय महत्वाची ठरेल, असे त्यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर भारतीय व्यावसायिकांच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, आमच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांच्या कौशल्यावर आणि अभिनवतेवर जगाने दाखवलेला विश्वास नवीन उंची गाठत आहे. या दशकात तोच आदर आणि प्रतिष्ठा जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी आणि या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तींसाठी दिसून येते आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अमाप संधींची भूमी म्हणून संबोधण्यामागे पाच मुख्य कारणं आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पहिले-वैविध्यपूर्ण लोकसंख्या आणि वैविध्यपूर्ण हवामान क्षेत्र, दुसरे-भारताचे प्रतिभावंत मनुष्यबळ, तिसरे-भारतात व्यवसाय सुलभीकरणासाठी होत असलेले प्रयत्न, चौथे-भारतात जैव-उत्पादनांची सातत्याने वाढणारी मागणी आणि पाचवे-भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्र आणि त्याच्या यशस्वितेचा उंचावणारा आलेख.

सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता आणि शक्ती वाढवण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत असे पंतप्रधान म्हणाले. ‘सरकारच्या संपूर्ण कार्यपद्धती दृष्टीकोनावर’ ताण आहे यावर त्यांनी भर दिला. सबका साथ-सबका विकास हा मंत्र भारतातील विविध क्षेत्रांवरही लागू आहे. यामुळे संबंधित क्षेत्रातील चित्र पालटले आहे. आधी काही निवडक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जायचे आणि इतरांना स्वत:चा बचाव करण्यासाठी सोडले जायचे. आज प्रत्येक क्षेत्र, देशाच्या विकासाला चालना देत आहे, म्हणूनच प्रत्येक क्षेत्राची ‘साथ’ आणि प्रत्येक क्षेत्राचा ‘विकास’ ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. विचार आणि दृष्टिकोनातील हा बदल फलदायी ठरत असल्याचेही ते म्हणाले. अलिकडच्या वर्षांत अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्याची उदाहरणे त्यांनी दिली.

जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठीही अभूतपूर्व पावले उचलली जात आहेत, नवउद्यम (स्टार्ट अप्स) परिसंस्थेत ती स्पष्ट दिसून येतात. “गेल्या ८ वर्षात आपल्या देशात नवउद्यमांची संख्या काही ‘शे’ वरुन ७० हजारांपर्यंत वाढली आहे. हे ७० हजार नवउद्यम सुमारे ६० वेगवेगळ्या उद्योगांमध्ये उभे राहिले आहेत. यामध्येही ५ हजारांहून अधिक नवउद्यम जैवतंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. प्रत्येक १४वा नवउद्यम जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील आहे.

गेल्या वर्षीच असे ११०० हून अधिक जैवतंत्रज्ञान नवउद्यम उभे राहिले,” अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. या क्षेत्राकडे प्रतिभावंताचा ओघ वळू लागला आहे. अशात, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदारांची संख्या ९ पटीने वाढली आहे आणि जैवतंत्रज्ञान इनक्यूबेटर तसेच त्यांच्यासाठीची गुंतवणूक ७ पटीने वाढली आहे. जैवतंत्रज्ञान इनक्यूबेटरची संख्या २०१४ मध्ये ६ होती. आता ती ७५ झाली आहे. जैवतंत्रज्ञान उत्पादनांची संख्याही १० वरुन ७०० पेक्षा जास्त झाली आहे”, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

सरकार-केंद्रित दृष्टिकोनाच्या पलीकडे जाण्यासाठी सरकार नवीन सक्षम कार्यपद्धती प्रदान करण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देत आहे. BIRAC सारखे व्यासपीठ मजबूत केले जात आहेत आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये हा दृष्टीकोन दिसत आहे असे पंतप्रधान म्हणाले. नवउद्यमांसाठी स्टार्टअप इंडियाचे उदाहरण त्यांनी दिले. अंतराळ क्षेत्रासाठी IN-SPACE, संरक्षण नवउद्यमांसाठी iDEX, सेमी कंडक्टर्ससाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन, तरुणांमध्ये नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट इंडिया हेकेथॉन आणि बायोटेक स्टार्ट-अप एक्स्पो अशी उदाहरणे त्यांनी दिली.

“सबका प्रयास अंतर्गत, सरकार नवीन संस्थांच्या माध्यमातून उद्योगातील सर्वोत्कृष्ट विचारांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणत आहे. देशासाठी हा आणखी एक मोठा फायदा आहे. देशाला संशोधन आणि शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून नवीन यश मिळते, जगाचे खरे स्वरुप पाहण्यास उद्योग मदत करतात आणि आवश्यक धोरणात्मक वातावरण तसेच आवश्यक पायाभूत सुविधा सरकार पुरवते”, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. “सर्वाधिक मागणी असलेल्या क्षेत्रांपैकी जैवतंत्रज्ञान क्षेत्र एक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात राहणीमान सुलभता (इज ऑफ लिव्हिंगच्या) मोहिमांनी जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी संधींची नवीन कवाडे खुली केली आहेत.” आरोग्य, कृषी, ऊर्जा, नैसर्गिक शेती, जैव पोषणयुक्त बियाणे हे या क्षेत्रासाठी नवीन मार्ग प्रशस्त करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -