Monday, July 15, 2024
Homeक्रीडाप्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईचा वर्ल्ड रेकॉर्ड

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईचा वर्ल्ड रेकॉर्ड

७२५ धावांनी उत्तराखंडचा केला पराभव

मुंबई (प्रतिनिधी) : रणजी ट्राफी २०२२ च्या दुसऱ्या उपांत्य पूर्व सामन्यात बलाढ्य मुंबईने उत्तराखंडचा तब्बल ७२५ धावांनी पराभव केला आहे. यासह मुंबईने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकता आलेला नाही. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहेच, शिवाय जगातील सर्व प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा विराट विजय आहे.

१९२९-३० मध्ये न्यू साउथ वेल्सने क्वींसलँडवर तब्बल ६८५ धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. आता ९३ वर्षानंतर मुंबईने हा विक्रम मोडीत काढलाय. रणजी चषकात सर्वाधिक धावांने विजय मिळवण्याचा विक्रम पश्चिम बंगालच्या नावावर होता. पश्चिम बंगालने १९५३-५४ मध्ये ओडिशाचा ५४० धावांनी पराभव केला होता. हा विक्रमही मुंबईने मोडला आहे. या विजयासह मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुंबईचा हा विजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे. मुंबईने या सामन्यात उत्तराखंडला ७९५ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात उत्तराखंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ ६९ धावा करू शकला.

सुवेद पारकरने पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक (२५२) आणि सर्फराज खानच्या १५३ धावांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिला डाव ६४७/८ धावांवर घोषित केला. उत्तराखंडचा संघ पहिल्या डावात केवळ ११४ धावांत आटोपला. मुंबईकडून शम्स मुलानीने सर्वाधिक ५ विकेट घेतले. मुंबईने ५३३ धावांच्या आघाडीसह दुसरा डाव २६१/३ वर घोषित केला आणि उत्तराखंडसमोर ७९४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. उत्तराखंडच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली आणि संघाला केवळ ६९ धावा करता आल्या. आता १४ जून रोजी उपांत्य फेरीत मुंबईचा सामना उत्तर प्रदेश संघासोबत होणार आहे. उपांत्य पूर्व सामन्यात मुंबईच्या संघाने पहिल्या चेंडूपासूनच उत्तराखंडवर वर्चस्व ठेवले होते.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम -मुंबई (उत्तराखंड विरुद्ध २०२२) – ७२५ धावा

न्यू साउथ वेल्स (क्वीन्सलँड विरुद्ध, १९२९/३० मध्ये) – ६८५ धावा

इंग्लंड (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, १९२८/२९ मध्ये) – ६७५ धावा

न्यू साउथ वेल्स (दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध, १९२०/२१ मध्ये) – ६३८ धावा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -