Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीउद्धव ठाकरे यांचं शिव्यासंपर्क अभियान!

उद्धव ठाकरे यांचं शिव्यासंपर्क अभियान!

  • श्री. नारायण राणे, केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री

१४ मे २०२२ रोजी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांची फार मोठा गाजावाजा केलेली सभा वांद्र्यातील बीकेसी ग्राऊंडवर झाली. एवढा मोठा गाजावाजा आणि जाहिरातबाजीवर कोट्यवधींचा खर्च केल्यानंतर सुद्धा सभेची जागा अर्ध्यापेक्षा अधिक रिकामी होती. श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष मैदान सोडून जात असल्याचे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना मोबाइलवर बोलण्यामध्ये आणि मोबाइलच्या वापरामध्ये दंग असणाऱ्या गर्दीबाबत त्यांच्यामध्ये जिवंतपणा आहे, असे वर्णन करण्याचा आंधळेपणा श्री. उद्धवजी यांच्याशिवाय अन्य कोणी करू शकणार नाहीत. मोबाइलमध्ये दंग असलेल्या या खोगीर भरतीचा, हे सगळे वाघ आहेत, वाघ, असा उल्लेख श्री. उद्धव ठाकरेच करू शकतात.

सभेच्या जाहिरातीमध्ये ‘शिवसंपर्क अभियान’ आणि ‘हृदयात राम, हाताला काम’ अशी घोषणाबाजी होती. शीव म्हणजे साक्षात भगवान शंकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज. दोघेही मराठी व हिंदूजनांसाठी पूजनीय. देवाच्या नावाने सुरू केलेल्या या अभियानात शिवराळ आणि खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये बाष्कळ बडबड करून श्री. उद्धवजी ठाकरे यांनी देवाला बदनाम करण्याचे काम केले. हे त्यांचे शिव्यासंपर्क अभियान झाले. कोणाला गाढव म्हण, कोणाला मनोरुग्ण म्हण हे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला शोभतं काय आणि असे हे मुख्यमंत्री सुसंस्कृत आहेत काय? याचा विचार आता महाराष्ट्राच्या जनतेनेच केला पाहिजे.

मा. शिवसेनाप्रमुखांचा विचार घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत असे श्री. उद्धव ठाकरे सभेच्या सुरुवातीला म्हणाले. सत्तेची हाव सुटल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी या हिंदुत्वविरोधी विचारांच्या पक्षांबरोबर अनैसर्गिक साथ-सोबत करणे हा शिवसेनाप्रमुखांचा विचार होऊ शकत नाही. ते मा. शिवसेनाप्रमुखांचे विचार घेऊन नाही, तर साहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून राजकारण करीत आहेत. ‘गाढवाने लाथ मारण्याआधी आम्ही साथ सोडली’ असेही भाजपच्या बाबतीत श्री. उद्धव ठाकरे म्हणतात. मुख्यमंत्रीपदाच्या आणि सत्तेच्या हव्यासासाठी हिंदुत्वाला लाथ मारली, हे का नाही सांगत? ज्या भावाबरोबर अर्ध आयुष्य एकत्र घालविलं, त्या भावाला मनोरुग्ण ठरवून त्याच्या मेंदूमध्ये केमिकल लोच्या झाला आहे, हे जाहीर व्यासपीठावरून बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. केमिकल लोच्या कोणाच्या मेंदूमध्ये? हिंदुत्वविरोधी पक्षांबरोबर अनैसर्गिक संबंध ठेऊन मुख्यमंत्रीपदाचा हव्यास पूर्ण करणे आणि वर पुन्हा आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही म्हणणे म्हणजे मेंदूतील केमिकल लोच्या नाही काय?

श्री. उद्धव ठाकरे व पाटणकर परिवाराच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत तक्रारीवरून व पुराव्यानुसार एन्फोर्समेंट डायरोक्टरेटने कारवाई सुरू केल्यानंतर या मंडळींचा जळफटाट झाला. यावर श्री. उद्धव ठाकरे यांनी वांद्र्याच्या जाहीर सभेमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आमच्या कुटुंबीयांवर येत आहेत, हे हिंदुत्व आहे काय असे वक्तव्य केले. भ्रष्टाचारावर कारवाई करणे हिंदुत्वाच्या तत्त्वांमध्ये बसत नाही, अशी श्री. उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या आहे काय?

पाकिस्तानात लपून बसलेला फरार आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि भाजप याबाबत श्री. उद्धव ठाकरे यांनी बाष्कळ विधाने केली. दाऊद आणि त्याच्या बगलबच्च्यांबरोबर आर्थिक आणि जमिनीचे व्यवहार करणाऱ्या श्री. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यास केंद्रीय तपासयंत्रणांनी तुरुंगात बसविले असताना त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्याची ज्यांची हिंमत नाही, त्यांनी दाऊदबद्दल भाजपवर बाष्कळ टीका करावी? याला तोल सुटल्याचे लक्षण समजावयाचे नाही, तर काय समजावयाचे?

२०१९ मध्ये मी मुख्यमंत्री झालो हा चमत्कार, माझ्या पूर्वजांची पुण्याई, असे उद्गार श्री. उद्धव ठाकरे यांनी काढले. अनवधानाने ते खरे बोलून गेले. यांना स्वतःलाच मुख्यमंत्रीपदाचा हव्यास होता व आहे हे त्यांच्याच तोंडून बाहेर आले. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसविण्याचे वचन साहेबांना दिले, असे तुम्हीच सांगता. त्या वचनाचे काय झाले? तेसुद्धा तुमच्या हिंदुत्वासारखे बोगस?

दोन कोटी लोकांचे रोजगार गेले, महागाई वाढते आहे, यावरून श्री. उद्धव यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राज्य सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? सत्तेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मलईसाठीच फक्त सत्ता पाहिजे का? जनतेच्या सुखदुःखाशी तुम्हाला काही देणं-घेणं राहिलेलं नाही हेच खरं! इतर राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला असताना महाराष्ट्रामध्ये तुम्ही कर कमी का करीत नाही? तुमच्या सरकारच्या औद्योगिक धोरणामध्ये राज्यातील जनतेला २५ लाख रोजगार देण्याच्या तुमच्या घोषणेचं काय झालं? तुमचे मंत्री जाहीर सभेमध्ये ३ लाख रोजगार मिळणार, असे सांगतात. तुम्ही राज्यातील बेकारी कमी करण्यासाठी काय केले? नुसते करार करून रोजगार मिळत नाहीत. त्यासाठी उद्योग व कारखाने उभे रहावे लागतात. तुमच्या काळात नव्याने किती उद्योग प्रत्यक्षात कार्यरत झाले व त्यातून किती लोकांना रोजगार मिळाले? पोकळ भाषणबाजीने लोकांना रोजगार मिळत नाही. लोकांच्या हातात धोंडे देऊ नका, असेही श्री. उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले. ज्या शिवसेनेने मराठी तरुणांच्या हातात दगड देऊन एक पिढी बरबाद केली, त्यांनी आता हा उपदेश करावा, हा मोठा विनोद.

राज्य चालविण्यामध्ये श्री. उद्धव ठाकरे यांना सपशेल अपयश आल्यामुळेच ते त्यांच्या हातखंडा प्रयोगाप्रमाणे अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याच्या सवयीला या सभेतही जागले. तुम्ही वाजविलेल्या थाळ्या आजही रिकाम्या आहेत म्हणताना त्यांनी थोडी माहिती घेतली असती, तर बरे झाले असते. केंद्र सरकार गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून देशातील करोडो गरीबांना कोरोना काळामध्ये व आजसुद्धा अब्जावधी रुपयांचे मोफत धान्य देत आहे. तुमची शिवभोजन थाळी योजना हा मोठा भ्रष्टाचार आहे. या थाळीचे पैसे तम्ही वाजवून घेत आहात. मुंबईत श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मेट्रो रेल्वेच्या विकासाला गती दिली होती. श्री. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर आल्यांनतर पहिले कोणते काम केले असेल, तर ते मेट्रोच्या कामांना स्थगिती देण्याचे प्रशासकीय कारभाराचे एक अक्षरही माहिती नसल्यामुळे केवळ भावनेच्या आहारी जाऊन दिलेल्या स्थगितीमुळे मेट्रो रेल्वेची कामे रखडली. आपल्या या तुघलकी कारभाराचे खापर या सभेत ते केंद्र सरकारवर फोडून मोकळे झाले. या असल्या निर्णयामुळे मेट्रो सुरू होण्याला किती वर्षांचा विलंब होणार आहे आणि सरकारच्या तिजोरीला किती मोठा फटका बसणार आहे, याचा हिशोब श्री. उद्धव ठाकरे यांनीच दिला पाहिजे.

या सभेत श्री. उद्धव ठाकरे यांनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या दर्जाची त्यांना पुसटशीही कल्पना नाही हे सिद्ध करते. ‘तुकडे तुकडे करू’, ‘महाराष्ट्र पेटून उठेल’ अशी हिंसाचाराला जाहीर व्यासपीठावरून चिथावणी देणारी भाषा महाराष्ट्राच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आजवर केलेली नाही. महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण व्हावे, अशी श्री. उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे काय?

राज्यात सांगावे असे जनतेचे एकही काम केलेले नाही. प्रशासनावर अंकुश नाही. त्यामुळे राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शिवराळ भाषण करून आपण फार काही कर्तृत्ववान आहोत हा दाखवायचा केविलवाणा प्रयत्न आहे. तेव्हा या मुख्यमंत्र्यांच्या हातून कोणतेही जनहिताचे काम होणार नाही. हे राज्य चालवू शकत नाहीत, असे जनतेचे मत असल्याने त्यांनी हिंदुत्वसारखे जड शब्द उच्चारू नयेत. ते त्यांना पेलवणारे नाहीत. हिंदुत्वाचा त्याग फक्त आणि फक्त पदासाठी व पैशासाठी. मला वाटते एवढे बस्स.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -