मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणासाठी जामिनाची मागणी केली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना जामीन दिला नसला तरी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुरुंगात असल्यामुळे नवाब मलिक यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुळे हा निर्णय मलिक यांच्यासाठी दिलासा मानला जात आहे.
नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. उपचारांबरोबरच पोलिस बंदोबस्तासाठी येणारा खर्च मलिक कुटुंबाला उचलावा लागणार आहे. मलिक यांच्यासोबत एकाच कुटुंब सदस्याला राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. सुरुवातीला ते पोलीस कोठडीत होते. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तेव्हापासून नवाब मलिक यांच्या शारीरिक व्याधी उफाळून आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना स्ट्रेचरवरून जे. जे. रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी जामिनाची मागणी केली होती. मला मूत्रपिंडाचा आजार असून त्यामुळे पायांना सूज येत आहे. त्याशिवाय अनेक आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी उपचार करण्याची इच्छा असल्याने सहा आठवड्यांपुरता जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.