मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने झटका दिला आहे. अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचाराची परवानगी मागितली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली आहे. खासगी रुग्णालयाऐवजी जे. जे. रुग्णालयात खांद्यावरील शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
ईडीने अनिल देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यास विरोध दर्शविला होता. देशमुख यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या निखळलेल्या खांद्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. जे. जे. रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आणि तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत, असा अहवाल ईडीने कोर्टात सादर केला होता. या अहवालाच्या आधारे ईडीने देशमुख यांच्या खासगी रुग्णालयातील उपचारांच्या विनंतीला तीव्र विरोध दर्शविला होता. या अहवालाची दखल घेत विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी विनंती फेटाळली.