कर्नल चांदवडकर त्या पंचतारांकित हॉटेलात मोठ्या मजेत चहाचे घोट घेत बसले होते. समोरच्या स्विमिंग पूलमध्ये छोट्या बालकांपासून ते तरुण युवक-युवतींपर्यंत कितीकजण जलस्नानाचा आनंद घेत होते. तो मधुर हास्यनाद… समोर अगदी राजेशाही थाटाचा चहा नि नाश्ता… हातात चिरूट! वा! इतके दिवस कुठे हरवलं होतं ते सुख?
आयुष्यातली एवढी सुंदर आणि मोलाची वर्ष आपण का बरं वेड्यासारखी वाया घालवली?
त्यांना पत्नी प्रमिलाची प्रकर्षानं आठवण झाली. किती तरुण वयात सोडून गेली!
‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ हे जणू त्यांचच जीवन गाणं होतं. आलोकला मागे ठेवून प्रमिला गेली ते फक्त एक वचन घेऊन.
‘मी चालले. तुमच्याबरोबर सुखानं
संसार करायची माझी इच्छा तशीच अधुरी राहिली. आलोकची ठेव मी तुमच्यापाशी ठेवून जातेय. त्याला आईच्या मायेनं जपा नि बापाच्या तोलानं वाढवा!’
बस्…तिचे हे अखेरचे शब्द. तिचा हातात असलेला हात घट्ट दाबून त्यांनी वचन दिलं…
“आलोक हा माझा बहिचर प्राण असेल, सुखानं जा. मी जपेन त्याला.’ कर्नल चांदवडकरांना एकदम अपराधी वाटलं.
तेवीस वर्षं जपलेलं ते वचन आपण अगदी अचानक तोडलं? कसं? का? प्रमिले, तुला जर सारं कळलं, तर तू म्हणशील का राह्यलात इतका छळ सोसत तुम्ही आलोकजवळ? खरंच! का राहिलो आपण आलोकजवळ ही गेली दहा वर्षं? तसं पाहिलं तर आलोकचं लग्न झाल्यापासून या दुःखाला सुरुवात झाली होती. आलोकची आणि त्याच्या पत्नीची अशी सोयी स्कर समजूत होती की, डॅडींना ‘ते’ सांभाळत आहेत. वस्तुतः आलोक आणि अलका डॅडींच्या प्रशस्त बंगल्यात राहत होते. आलोक आणि अलका डॅडींचा कुक आणि पर्सनल सर्व्हंट वापरीत होते. आलोकची बडी नोकरी डॅडींच्या कृपेचं फळ होती. पण ‘कृतज्ञता’ या शब्दाचा अर्थ बहुधा आलोक विसरला असावा! आणि अलकाला तर तो शब्द ठाऊकच नसावा. तिच्या शब्दकोशातून तो गळाला असावा. डॅडींची अडचण एवढ्या प्रशस्त बंगल्यात अन्यथा दोघांना झाली नसती. पायाला गोळी लागली म्हणून पाकिस्तानच्या बॉर्डरवरून कर्नल चांदवडकरांना डलहौसीला पीस पोस्टिंग देण्यात आलं आणि निवृत्तीनंतर त्यांनी तिथेच ही भव्य वास्तू उभी केली. सुंदर आणि निसर्गरम्य असा डलहौसीचा परिसर त्यांना फार फार आवडला होता. प्रमिलाचा मोठा फोटो त्यांच्या स्वतःच्या बेडरूममध्ये सोबतीला होता. बस्! पण ही बेडरूम अधिक हवेशीर असल्यानं आणि इथून समोरची हिरवाई स्वच्छ नजरेत भरत असल्यानं अलकाचा तिच्यावर आल्या दिवसापासून डोळा होता.
‘डॅडी, आम्ही एक्कच आठवडा झोपू तुमच्या बेडरूममध्ये?’ तिनं लाडेलाडे विचारलं. डॅडींनी विचार केला… नव लग्नय. नव्या इच्छा आहेत. झोपू दे. त्यांनी आनंदानं होकार दिला.
पण एक आठवडा मारुतीच्या शेपटासारखा लांबतच गेला. अलका आता बाहेर पडेल… मग बाहेर पडेल, असा विचार कर्नल साहेब करतायत करतायत! पण रामा शिवा गोविंदा! बाहेर पडला तो फक्त डॅडींच्या बेडरूममधला प्रमिलाचा फोटो! तो डॅडींना नियुक्त केलेल्या बेडरूममध्ये लागला आणि त्या पूर्वीच्या जागी आता तिचं फॅमिली पोर्टेट लागलं. ती आलोक आणि तिचे आई-वडील! डॅडींनी हा पराभव पचवला. आलोकच्या सुखासाठी पचवला!
पण तो त्यांना फार महागात पडला. कारण प्रमिलाचे आई-वडील जेव्हा दोन महिन्यांकरिता या बंगल्यात मुक्कामाला आले तेव्हा डॅडींची बेडरूम जाऊन ते हॉलमध्ये आले. किती साहजिक ना! ते प्रौढ असलं तरी जोडपं! डॅडी एकटे! त्यांना दोन महिन्यांकरिता बेडरूम नसली तर काय झालं? शिवाय ते काही बिनकामाचे आले नव्हते. प्रमिलाच्या बाळंतपणाला आले होते.
प्रमिलाचं बाळ आल्यावर मग तीही बेडरूम कायमची गेली. ती आता बाळाची खोली झाली.
बाळ मोनाचे खेळ, छोटा पलंग, झबली, दुपटी. चिमण्या नातीशी कसली स्पर्धा म्हणून डॅडी वरच्या मजल्यावर चालते झाले.
पण पुढच्या दोनच वर्षांत प्रमिलानं युवराजांना जन्म दिला आणि तेजससाठी वरचा संपूर्ण भाग रिकामा करण्यात आला.
‘डॅडी, आपल्याला आऊटहाऊस रिनोव्हेट करून देते. अगदी फैन बीन लावून.’ अलकानं बेशरमपणे म्हटलं,
हॉल नको… तिथं प्रायव्हसी नसते म्हणून अत्यंत विमनस्क अवस्थेत डॅडी आऊट हाऊसमध्ये राहायला गेले. प्रमिलाचा फोटो घेऊन. आता फक्त डबा घेऊन त्यांचाच पर्सनल सर्व्हट त्या खोलीत येई. बाकी बंगला त्यांना परका!
‘माझ्या घरी मी पाहुणा!’ डॅडींचा प्रक्षोभ!
आलोक नि अलका सुट्टीसाठी लंडनला गेलेयत नि एकवीस दिवस परतणार नाहीत, हे त्यांना त्यांच्या पर्सनल सहँटकडूनच कळलं आणि त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. तडकाफडकी सगळी इस्टेट विकून टाकली आणि भली लठ्ठ रक्कम बँकेत उत्तम प्रकारे गुंतवली. आपल्या दोन्ही नोकरांना पेन्शन चालू केली आणि स्वतः या प्रशस्त सुंदर पंचतारांकित हॉटेलात कायमसाठी राहायला आले. प्रमिले… आज तू जिवंत असतीस, तरी याच माझ्या निर्णयाचं स्वागत केलं असतंस. ते मनाशी म्हणाले.
‘साब आपके लिये व्हिजिटर है!’
‘भेज दो.’ त्यांनी चिरूट बाजूला करीत म्हटलं, आले कोण? आलोक नि अलका! त्यांना कल्पना होतीच. हबकलेले वीर येणार कुठे? जाणार कुठे? वासावरले कुत्रे ही बरे! पण आता ते माझे नाहीत. कुणी नाहीत. मी माझा! बस… ‘डॅडी… हे… हे सगळं काय करून बसलात?’ अलकानं रडत विचारलं. आलोकचा चेहरा जळकं थालीपीठ झाला होता.
‘माझी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी मी माझ्या इच्छेप्रमाणे विकली. गैर काय त्यात? तुमचं सर्व सामान आऊटहाऊसमध्ये सुरक्षित आहे. याही उप्पर नवा बंगला हवा असेल, तर कष्ट करून, बचत करून पैसे जमवा नि घ्या. बाकी आपल्यासारख्या सुविद्य व्यक्तींना सल्ला देणारा मी कोण म्हणा! आलाच आहात तर सरबत घेऊन जा. बेअरा ह्यांना सरबत आणा आणि ह्यांच्या मुलांना माझ्यातर्फे एक केक पार्सल करून द्या.’ डॅडी मग खुर्ची फिरवून जलक्रीडा पाहत राहिले. स्वस्थचित्त आलोक नि अलकाच्या पायाखालची धरणी मात्र सरकली होती.