रवींद्रनाथ टागोर यांची जयंती ७ मे रोजी झाली. त्यांचे शैक्षणिक, वैज्ञानिक विचार, त्यांची देशभक्ती आणि मानवतावाद आजच्या पिढीला प्रेरित करणारा आहे.
मृणालिनी कुलकर्णी
७ मे, साहित्य, संगीत, कला यांचे अद्भुत मिलाफ असलेल्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची जयंती! आधुनिक भारतातील एक उत्कृष्ट सर्जनशील कलाकार, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ ते बंगाली कवी गीतकार, संगीतकार, नाटककार, चित्रकार, आपल्या भारताचे ‘जनगणमन’ राष्ट्रगीत लििहणारे, ‘गीतांजली’ काव्यसंग्रहाला मिळालेला पहिला नोबेल पुरस्कार, पाश्चिमात्य जगाला भारतीय बुद्धीची झलक दाखविणारे, रवीद्रनाथांचे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व!
ठाकूर परिवारातील रवींद्रनाथ हे चौदावे अपत्य. (७ मे १८६१) रवींद्रनाथांनी शालेय शिक्षण टाळले. कराटे-जिम्नॅस्टिक, पोहण्याच्या बरोबर रवींद्रनाथांच्या विकासात विद्वान, व्यासंगी वडीलबंधू ज्योतींद्रनाथाचे स्थान मोठे आहे. टागोर कुटुंबाची जोराशंको वाडी म्हणजे संस्कार शाळाच! लहान वयातच इंग्लिश-युरोपिअन-संस्कृत साहित्याच्या सुसंस्काराबरोबरच पुरुषवर्गाच्या हातात लेखणी-कुंचला-वाद्य काहीतरी असायला हवे, हा कुळाचार होता. कलेकडे कधी शौक/चैन/उपजीविकेचे साधन म्हणून पहिले नाही. विलास आणि विकास यातला फरक समजत होते.
गुरुदेवावर लििहताना; ‘रवींद्रनाथ : तीन व्याख्याने’ या पुलंच्या पुस्तकाचा आणि इतरत्र वाचनाचा आधार घेतला. वयाच्या ११व्या वर्षीच देवेंद्रनाथांनी रवींद्रला बरोबर घेऊन अनेक महिने उत्तर हिंदुस्थानात फिरले. प्रवासात पितापुत्रापेक्षा गुरू-शिष्य नात्याने रवींद्र इतिहास, विज्ञान खगोलचे ज्ञान मिळवत होते. चार भिंतीतून मुक्त झाल्यावर शिक्षण आनंदमय होते, ही अनुभूती मिळाली. याच ११/१२व्या वर्षी दरोडेखोरांच्या वस्तीत निसर्गाला सोबत घेऊन शाळा काढायचे रवींद्रने ठरविले. रवींद्रनाथांनी कायद्याचा अभ्यास लंडनमध्ये करून बॅरिस्टरसाठी इंग्लंडला गेले; परंतु पदवी न घेताच भारतात आले.
रवींद्रनाथांनी वयाच्या ८ व्या वर्षी भानुसिंह नावाने कविता लिहिली. नंतर १२-१६-१८-२० वयात ‘मॅकबेथ’चे बंगाली रूपांतर-वल्मिकी प्रतिभा हे गीतनाट्य, लहान मुलांसाठी प्रेरणादायी लघुकथा, २०००च्या वर गाणी रचून त्यांना चाली लावल्या, ५०च्या वर नाटके लिहिली, हे सारे लेखन स्वतःला उत्तम इंग्लिश येत असूनही बंगालीतच लिहिले. जगातील दर्जेदार साहित्य देशी भाषेत यावे, म्हणून अनुवाद केला. वयाच्या साठीनंतर हजारात रंगविलेल्या कॅनव्हासची रंगसंगती पाहता, पॅरिसमधील समीक्षक अवाक् झाले होते. कलेत जे जे केले, ते विलक्षण उत्कटतेने, त्याची कळकळ जाणवते. डझनभर देशांचा दौरा केला. सर्वांशी त्यांचा संवाद होता.
रवींद्रनाथांची असामान्य प्रतिभा ओळखूनही वडिलांनी कष्टमय जीवन जाणण्यासाठी, प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाचा अनुभव दिला. त्यामुळे शहर आणि खेडे यातील अभेद्य भिंत लक्षात आली. युरोपियन ज्ञानापेक्षा इंग्रजीचा पोपटपणा लक्षात आला. इंग्रजी भाषेमुळे शहरात बंगाली भाषेविषयी तिरस्कार निर्माण झालेला पाहताच आपली प्रतिभा शिक्षणासाठी/शांतिनिकेतनसाठी खर्च करायची ठरविले. शांतिनिकेतनसाठी स्वतःचा संसार गुंडाळून सारे पैसे, पत्नी मृणालिनीदेवीने दिलेले दागिनेही विकले.
रवींद्रनाथांचे शैक्षणिक विचार :
- शिकायला येणारी मुले मनानी मुक्त कशी होतील हे पाहा. दडपण आणि विकास संभवत नाही.
- मुलांच्या कानावर जी भाषा सतत पडते, त्या भाषेतून शिकवा. शिकविण्याच्या पद्धतीला चौकट करू नका.
- निसर्गाशी नातं जोडा, मूल जिथं वाढतं, त्या वातावरणात मुलांच्या शरीराचं, मनाचं पोषण होत.
- शिक्षणात ग्रंथाइतकेच हातांनी काहीतरी करायचे याला महत्त्व आहे. संगीत-नृत्य-नाट्य ही शिक्षणाची अविभाज्य अंगे असून मुलांचे हात चित्रशिल्पाच्या निर्मितीत गुंतवा.
रवींद्रनाथांच्या जीवनात नवी निर्मिती घडवून आणणाऱ्या कृतीला स्थान होतं. प्रतिकृतीला किंवा अनुकरणाला नव्हतं. शांतिनिकेतन, विज्ञान संशोधनाच्या प्रयोगशाळा सुरू केल्या ते श्रीनिकेतन; सारं विश्व एका घरट्यासारखं व्हावं यासाठी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना करून पारंपरिक शिक्षणाला आवाहन दिले.
विज्ञानवादी विचार : व्यापाराच्या निमित्ताने ठाकूर कुटुंबाचा इंग्रजांशी तीन पिढ्यांचा संबंध होता. इंग्रजांनीच ठाकूरचे टागोर केले. या कुटुंबाने युरोपियन विद्या घेतली, पण त्यांची संस्कृती स्वीकारली नाही. भारतीयच संस्कृती, तत्त्वज्ञान, कला जोपासली.
प्रिन्स द्वारकानाथांनी (आजोबा) त्या काळी मेडिकल कॉलेजला ४ लाखांची देणगी दिली होती. त्याहीपुढे हिंदू विद्यार्थी अभ्यासासाठी प्रेतं फाडायला घाबरतात, हे कळल्यावर स्वतः डिसेक्शनच्या तासाला विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी उभे राहत. शिवाशिवीच्या सनातनी विरोधाला फोडून काढले.
रवींद्रनाथ सामाजिक बांधिलकी मानणारे कलावंत होते. ‘मुक्ती’ हा रवींद्रनाथांच्या सर्वच नाटकांचा मध्यवर्ती विचार. अनिष्ट प्रवृत्ती/रीतीपासून मुक्ती. त्या काळात त्यांच्या कुटुंबातल्या मुलींना नाटकात काम करायला, गाणं म्हणायला उभं करणं हेच मुक्ती चळवळीतलं एक पाऊल होतं. सौंदर्य पाहू शकणारा मनुष्य घडविणे म्हणजेच माणूस घडविणे हा त्यांचा कवी धर्म होता. वैयक्तिक जीवनातलं दुःख त्यांच्या साहित्यात कधीच प्रकट झाले नाही.
रवींद्रनाथांची देशभक्ती : देशापुढल्या अनेक प्रश्नावर त्यांचे लेख/भाषणे गाजली होती. १९१९ मध्ये जालियन बाग हत्याकांडानंतर रवींद्रनाथांनी जॉर्ज पंचमकडून मिळालेली ‘सर’ ही पदवी परत केली. देशबांधवांना जागृत करताना त्यांनी भाकडकथा किंवा आंधळ्या पूर्वज पूजेचा कधीच आधार घेतला नाही.
रवींद्रनाथांचा मानवतावाद : राष्ट्रवाद आणि मानवतावाद यात रवींद्रनाथ मानवतावादाला महत्त्व देत होते. मानवतावाद त्यांच्या अनेक कलाकृतींमधून दिसून येतो. ‘गोरा’ या सर्वोत्कृष्ट रचनेत एका इंग्रज जोडप्याची मुले अनाथ असल्याने हिंदू कुटुंबात वाढतात. आपण ख्रिश्चन आहोत हे वास्तव कळताच त्यांच्या विचारात मोठा बदल होतो, ते फक्त मानवी संबंध महत्त्वाचा मानू लागतात. विश्व कवी होण्याची क्षमता रवींद्रनाथांमध्ये होती. कवितेतील मानवतावादाने त्यांना जगभरात मान्यता मिळवून दिली. गुरुदेव म्हणतात, मानवता माझा आश्रय आहे. रवींद्रनाथ हे कॉस्मोपॉलिट्यनिझमचे प्रखर पुरस्कर्ते होते. मानवतावाद व स्वातंत्र्य या दोन मूलभूत घटकांमुळे त्यांनी राष्ट्रवादापेक्षा आंतरराष्ट्रीय वादाचा जोरदार पुरस्कार केला होता.
रवींद्रनाथांना पाहिल्याने, ऐकल्याने, अनुभवल्याने आपली एकूण शक्तीच नव्हे, तर क्षेत्रही विस्तारते. रवींद्रनाथ आपल्याला धीर देतात, आनंद द्विगुणित करतात, अनुभव अधिक समृद्ध करतात, निसर्गातल्या एखाद्या दृश्याची परिणामकारकता वाढवतात, रंगालाही सुगंध देतात. अशा मानवतावादी विचारवंत रवींद्रनाथ टागोर यांना माझा नमस्कार.