Friday, April 25, 2025

शहाणपण

माधवी घारपुरे

किती गंमत असते ना, एकेका शब्दाची! उदाहरणार्थ ‘सिकंदर’ घ्या, ‘शिक्कामोर्तब’ घ्या, ‘पांढरपेशा’ घ्या, ‘अनागोंदी’ घ्या, किंवा थिल्लर घ्या. एक ना दोन असे शेकडो शब्द सापडतील की त्या त्या शब्दामागची हकिकत किंवा इतिहास वेगळाच आहे, त्याला अनेक पदर आहेत.

तसंच ‘शहाणपण’ हा आपल्या नित्य वापरातला शब्द किती प्रकारचे अर्थ आपल्याबरोबर घेऊन वावरतो. ‘शहाणपण २’ असं मी मुद्दामच म्हटलंय. कारण पूर्वी ‘शहाणपण’ यावर एक स्फूट माझे ‘दवबिंदू’ पुस्तकात मिळेल. आज परत याचा विचार येण्याचं कारण म्हणजे आम्ही गेलो होतो ‘घारापुरीची लेणी’ पाहायला. तिथे एक शाळकरी मुलांचा ग्रुप आला होता. दीड वाजता डबे खाऊन मुले गोलाकार बसली होती. सर प्रश्न विचारत होते आणि मुलं उत्तरे देत होती. एका मुलाने तक्रार केली.

‘सर हा मन्या मला म्हणतोय कळलं तुझं शहाणपण. सारखं चिडवतोय.’ सरांनी मन्याला विचारलं तर शहाणपण म्हणजे काय? त्याला सांगता येईना. केव्हा येतं शहाणपण? असं विचारल्यावर एक म्हणाला, ‘मोठे झाल्यावर.’

दुसरा म्हणाला, ‘लग्न झाल्यावर’, तिसरा म्हणाला, ‘१६ व्या वर्षी.’ शेवटी सरांनी जे उत्तर दिलं ते मला आवडलं म्हणण्यापेक्षा पटलं. ते म्हणाले, ‘मला अजूनही शहाणपण आलेलं नाही. कारण शहाणपण हे मरेपर्यंत येतच असतं. कुणाकुणाला शेवटपर्यंत येतही नाही.’

शहाणपण हे ना वयावर अवलंबून ना हुद्द्यावर अवलंबून. इतकंच काय तर ते शिक्षणावरही अवलंबून नाही. ते शिकवायला आई-वडीलच असावेत, असा नियम नाही. ते पुस्तक वाचून येतं, मित्रांच्या संगतीत येतं, परिस्थिती शहाणपण शिकवते तसे अनुभवातूनच ते मिळतं. अर्थात खूपजणांनी शिकवलं तर टिपकागद कसा आहे यावर टिपणं अवलंबून आहे हे निश्चित.

‘शहाणपण’ या शब्दाची ठोस व्याख्या जरी करता आली नाही तरी असे नक्की सांगता येईल की, ज्ञान आणि अनुभव यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची किंवा अंदाज बांधण्याची क्षमता. सुजाणतेपण म्हणजे शहाणपण.

श्री. पु. भागवतांचा अनुभव मी मागच्या लेखात उदधृत केलाय. त्यांच्या आजीने त्यांना सांगितले की, ‘डिग्री मिळवलीस पण अभ्यास चालूच ठेवला पाहिजे तुला’ तेव्हा न. र. फाटक म्हणाले, ‘मी चार वर्षं ज्ञान दिलं पण खरं शहाणपण आजीनं दिलं.’

नेपोलियन तर म्हणायचा की, शहाणपण हे ठाम आणि करारी निर्णयात असतं.

पेशव्यांकडे सरदार पाहुणे आले असता त्यांनी सेवकाला सरबत आणायला सांगितलं. ते आणल्यावर प्रथम कुणाच्या हाती हा चांदीचा पेला द्यावा असा त्याला प्रश्न पडला. सरदार तर पाहुणे पण पेशवे मालक, मग त्याने शहाणपणाने पेशव्यांच्या हाती द्यावा. सरदार म्हणाले, ‘पेशवे सरकार माणूस शहाणा आहे.’ म्हणूनच म्हटलं ते हुद्द्यावर अवलंबून नाही. त्याला स्कुलिंग नाही.

शहाणपण म्हणजे आपल्या हाती असलेल्या वेळेचा आणि ज्ञानाचा उपयोग करणे. रामानंद बोटीतून प्रवास करताना त्यांना चक्क जपानी म्हातारा चिनी भाषेचा अभ्यास करताना आढळला. त्यांनी सहज म्हटले, ‘आजोबा, इतक्या म्हातारपणी चिनी भाषा शिकताय का? ’ त्यांनी नुसते मान वर करून पाहिले आणि म्हणाले, ‘श्वास आहे तोवर शिक्षण घेण्यात शहाणपण आहे.’

ज्ञान बोलते आणि शहाणपण ऐकते असे म्हणतात. त्यावरून मला कालिदासाची आठवण झाली आणि दोन्ही हातात दोन वाट्यांत खीर घेऊन प्रकटली. म्हणाली, उजव्या हातातली खीर प्यायलास तर ज्ञानी पण अल्पायुषी होशील. डाव्या हातातली खीर प्यायलास तर आयुष्यमान होशील. कालिदासाने क्षणाचाही विचार न करता दोन्ही खिरी पटकन प्यायल्या. कारण कोणीही एक वाटी घे असे मला म्हणाली नव्हती. म्हणून शहाणपण हे काही वेळा उपजत असते, काही निरीक्षणाने, काही संस्काराने, काही अभ्यासाने येते म्हणतात ते खोटे नाही. विवेक लक्षणे सांगताना रामदास म्हणतात,

जितुके काही आपणासी ठावे। तितुके हळूहळू
सिकवावे। शहाणे करूनी सोडावे। सकलजन.

शेवटी एकच खरे की, शहाणपण हा ‘पण’ आहे, जोडाक्षरविहित सरळ शब्द, पण आचरणात आणायला कठीण.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -