पुणे (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवडमध्ये माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी संबंधित असलेल्या लेटर बॉम्बची जोरदार चर्चा सुरू आहे. या पत्रामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी-विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटीपेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला असून ते थेट मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.
त्यात चार सहाय्यक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा समावेश आहे. याप्रकरणी कृष्ण प्रकाश यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिले असल्याचे समजते. डोंगरे यांचे अर्जदार म्हणून नाव आहे. प्रत्यक्षात मात्र हे पत्र आपण लिहिले नाही, असा दावा डोंगरे यांनी केला आहे. तसेच यावर त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले आहे. दरम्यान, ‘‘संबंधित पत्र मी लिहिलेच नाही, असं सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच तो बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या जबाबावर ठाम आहे”, असं व्हायरल पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आलं आहे.