ठाणे (प्रतिनिधी) : अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत राहिलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पाणीपुरवठा योजनेच्या वाटचालीस गती मिळणार आहे. ठाणे-मुंबईला पाणीपुरवठा करणारा शहापूर तालुक्याचा घसा मात्र पाण्यासाठी कोरडाच होता. मात्र आता अनेक वर्षे रखडलेल्या भावली धरण आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. टँकरग्रस्त शहापूर तालुक्याला दिलासा मिळणार आहे.
ठाणे महानगराची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा पाऊस चांगला झाला तरीही पाणीटंचाईने ग्रासले आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांवरील कूपनलिकांनासह विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. यावर उपाय म्हणून पाणीपुरवठा विभागाकडून दर वर्षी लाखो रुपये खर्च करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केले जातो. यंदाही ११ पाण्याच्या टँकरद्वारे ५ गावे आणि २७ आदिवासी पाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.
येत्या दिवसांत पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्येत तिपटीने वाढ होणार असून गेल्या वर्षाप्रमाणे १८ टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे संकेत शहापूर पाणीपुरवठा विभागाकडून मिळत आहेत. दरम्यान आता चित्र काहीसे बदलणार आहे. भावली धरण आराखड्यास जलजीवन मिशन अंतर्गत २१ मार्चच्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली व त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आली असता प्रतिसाद मिळाला नव्हता.
दरम्यान योजनेची अंदाजपत्रके व आराखडे चालू दरसूचीनुसार सुधारित करून ३१६ कोटी ४२ लाख २५ हजार ५०७ किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे दर वर्षी पाणीटंचाईने व्याकूळ होणाऱ्या एकूण ३५६ गावपाड्यांतील जनतेच्या घशाची कोरड संपुष्टात येणार आहे.
प्रत्येकाला मिळणार ५५ लिटर पाणी
जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांतील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नव्या योजनेत प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटरप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. शासनाने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेता, भावली पाणी योजनेला लवकरात लवकर सुरुवात करावी. दर वर्षी लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई संपुष्टात येण्यास मदत होईल, असा विश्वास पांडुरंग बरोरा यांनी व्यक्त केला आहे.