मुंबई (प्रतिनिधी) : एसी लोकलला प्रवाशांचा मिळत असलेला अल्प प्रतिसाद बघून या लोकलच्या तिकिटांचे दर निम्म्याने कमी करण्यात आले आहेत. गुरुवारपासून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. दरम्यान दर कमी होताच एसी लोकलच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे.
एकीकडे मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये वाढत असलेला उकाडा, तर दुसरीकडे लोकलमध्ये वाढलेली गर्दी यातून मार्ग म्हणून एसी लोकलचा पर्याय प्रवाशांनी निवडला आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकलच्या २ हजार ३०८ तिकिटांची विक्री झाली होती, तर पश्चिम रेल्वेवरही ३ हजार ५२ तिकिटे खरेदी करण्यात आली. हा प्रतिसाद इतर दिवसांच्या तुलनेत चांगला असल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वेने केला आहे. प्रवासी संख्या आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी एसी लोकलमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. पण एसी लोकलचे तिकीट दर पाहता प्रवाशांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. मात्र प्रवाशांचा एसी लोकलला असलेला थंड प्रतिसाद पाहून या लोकलच्या तिकिटांचे दर निम्म्याने कमी करण्यात आले आहेत. गुरुवारपासून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. दरम्यान दर कमी होताच एसी लोकलच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे.
सध्या उकाड्याचे दिवस असल्याने रेल्वे प्रवासी त्रस्त होत आहेत. त्यामुळे अनेकांनी एसी लोकलचा पर्याय स्विकारला आहे. तिकिटांचे दर कमी केल्याने खूश झालेल्या प्रवाशांनी एसी लोकलच्या फेऱ्या आता वाढवल्या पाहिजेत, असेही म्हटले आहेल. तसेच मासिक पासचे दर देखील शासनाने कमी करायला हवेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
उकाड्यात वाढ झाल्याने दुपारच्या सत्रात प्रवास करताना रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र एसी लोकलचे तिकीट दर जास्त असल्याने अनेकजण या लोकलचा प्रवास करणे टाळत होते. दरम्यान गुरुवारपासून एसी लोकलचे दर निम्म्याने कमी झाल्याने प्रवासी या लोकलला पसंती देत आहेत. पहिल्याच दिवशी गुरुवारी प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.