Saturday, April 26, 2025
Homeक्रीडापुनरागमनासाठी रॉयल्स उत्सुक

पुनरागमनासाठी रॉयल्स उत्सुक

आज पंजाब किंग्सविरुद्ध लढत

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलमध्ये शनिवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आपल्या फलंदाजीच्या उणीवा दूर करून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. राजस्थान रॉयल्स त्यांच्या फलंदाजीतील अडचणी दूर करून त्यांची विजयी मोहीम पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करेल.

राजस्थानचा सलग दोन सामन्यांत पराभव झाला आहे. त्यामुळे या सामन्यात ते विजय मिळवण्याच्या ईर्षेने उतरतील, तर दुसरीकडे, मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ गत सामन्यात गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरातवर आठ गडी राखून विजय मिळवून आत्मविश्वासाने भरून आलेला आहे. त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी या सामन्यात हीच विजयाची गती कायम ठेवण्यास उत्सुक असेल.

एकेकाळी रॉयल्सचा संघ सध्या टॉपवर असलेल्या गुजरात टायटन्सला अव्वल स्थानासाठी कडवी टक्कर देत होता. पण अलीकडे त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिले नाही. कोलकाता आणि मुंबईकडून पराभूत झाल्यानंतर आता त्याचा सामना पंजाबशी होणार आहे. राजस्थान सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे आणि मुख्य श्रेय जोस बटलरला जाते, ज्याने सध्याच्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक ५८८ धावा केल्या आहेत. तसेच युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे रॉयल्सच्या गोलंदाजीचा सामना करणे सातत्याचा अभाव असलेल्या पंजाबच्या फलंदाजांसाठी सोपे नसेल.

पंजाब किंग्जसाठी शिखर धवन, मयंक अग्रवाल, भानुका राजपक्षे आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्याकडून फलंदाजीमध्ये अजून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे, तर अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा आणि राहुल चहर हे तिघे विकेट घेणारे त्यांचे महत्त्वपूर्ण गोलंदाज असतील. दुसरीकडे, राजस्थान पुन्हा एकदा जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायर यांच्यावर खूप अवलंबून असतील.

बटलर-चहलची कामगिरी गरजेची!

जोस बटलर आणि युझवेंद्र चहलच्या कामगिरीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने मोसमातील बहुतेक सामन्यात वर्चस्व गाजवले आहे. ते इतके त्यांच्यावर अवलंबून आहेत की, नाणेफेक हरल्यानेही त्यांना फारसा फरक पडला नाही; परंतु मागील ३ सामन्यांमध्ये, बटलर पूर्वीच्या लयीत दिसला नाही आणि चहलनेही म्हणाव्या तितक्या विकेट्स घेतल्या नाहीत आणि त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या मागील २ सामन्यांतील सलग परभवांनी ते सिद्ध झाले आहे. पहिल्या ७ सामन्यांमध्ये, बटलरने राजस्थानच्या एकूण धावांपैकी ३८.८१ टक्के धावा म्हणजेच ४९१ धावा केल्या, तर चहलने १८ बळी घेतले आहेत. मागील ३ सामन्यांमध्ये बटलरने केवळ ९७ धावा केल्या आहेत आणि चहलने केवळ एक विकेट घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -