मालवण (वार्ताहर) : देवबाग गावाचे पावसाळ्यात होणाऱ्या समुद्री अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक ठिकाणी बंधारा घालण्याचे काम प्राधान्याने करण्यासाठी प्रयत्नशील आल्याचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी देवबाग येथे ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले.
देवबाग किनारपट्टीवर १९९० साली केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी बंधारा उभारून गाव वाचवला. सद्यस्थितीत जीर्ण झालेला बंधारा अनेक ठिकाणी कोसळला आहे, वाहून गेला आहे. आता नव्याने बंधारा उभारणी करणे गरजेचे आहे. देवबागचा बंधारा राणेच करू शकतात. अशा भावना देवबाग ग्रामस्थांनी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्याशी संवाद साधताना देवबाग संगम येथे व्यक्त केल्या. मागील आठवड्यात मालवण दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबाग दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला.
पावसाळ्यात होणाऱ्या समुद्री अतिक्रमणामुळे देवबाग गावास धोका निर्माण होणार असल्याने बंधाऱ्याचे काम मार्गी लावावे अशी आग्रही मागणी त्यावेळी ग्रामस्थांनी केली होती. यावेळी मंत्री राणे यांनी आपल्या खासदार फंडातून अत्यावश्यक ठिकाणी तत्काळ बंधाऱ्याचे काम करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनी दुपारी देवबाग गावास भेट देत किनारपट्टी भागाची पाहणी केली.