Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडामुंबईने तगड्या गुजरातला लोळवले

मुंबईने तगड्या गुजरातला लोळवले

सलामीवीरांसह सॅम्सच्या गोलंदाजीला विजयाचे श्रेय

मुंबई (प्रतिनिधी) : तारांकीत फलंदाजांचा अनफॉर्म आणि बुमरा वगळता अन्य गोलदाजांना आलेले अपयश यामुळे यंदाच्या हंगामात पराभवाने ग्रासलेल्या मुंबईने शुक्रवारी गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरातला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला. सलामीवीरांसह टीम डेवीडची धडाकेबाज फलंदाजी आणि शेवटच्या षटकासह संपूर्ण सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या डॅनियल सॅम्सला मुंबईच्या विजयाचे श्रेय जाते.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या गुजरातने कमालीची सुरुवात केली. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत संघाच्या धावफलकावर नाबाद शतक झळकावले. त्यात वृद्धीमान साहाच्या ५५ आणि शुबमन गीलच्या ५२ धावांचा समावेश आहे. धावांचा ओघ वाढवणाऱ्या गुजरातच्या साहा, गील या सलामीवीरांनी रोखण्यासाठी मुरुगम अश्वीन धावून आला. त्याने एकाच षटकात गील, साहा यांना बाद केल्याने मुंबईने सामन्यात पुनरागमन केले. कर्णधार हार्दीक पंड्याने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्याला साई सुदर्शनने थोडा वेळ साथ दिली.

पोलार्डच्या गोलंदाजीवर तो हीड विकेट बाद झाला. धावा आणि चेंडू यातील अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात पंड्याचा संयम सुटला. किशनने त्याला धावचीत केले. पंड्याने १४ चेंडूंत २४ धावा केल्या. निर्णायक क्षणी डेविड मिलर गुजरातसाठी लढत होता. यंदाच्या हंगामात गुजरातने शेवटच्या क्षणी खेळ उंचावत सामने जिंकले आहेत. त्यामुळे शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी ९ धावा अशा परिस्थितीत गुजरातचेच पारडे जड मानले जात होते. मुंबईच्या डॅनियल सॅम्सने शेवटच्या षटकात अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मुंबईला निसटता विजय मिळवून दिला. सॅम्सने शेवटच्या षटकात अवघ्या ४ धावा दिल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना ५ धावांनी जिंकला.

यंदाच्या हंगामात मुंबईचे सलामीवीर चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र लयीत असलेल्या गुजरातविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी मुंबईच्या सलामीवीरांना धावा काढण्यात यश आले. इशन किशन आणि रोहित शर्मा दोघेही फलंदाज प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांवर तुटून पडले. त्यामुळे मुंबईला अर्धशतकाची वेस नाबाद ओलांडता आली. इशन किशन आणि रोहित शर्मा दोघांचीही वैयक्तिक अर्धशतके थोडक्यात हुकली. इशनने २९ चेंडूंत ४५ धावा केल्या, तर रोहितने २८ चेंडूंत ४३ धावा जमवल्या. राशीद खानने पायचीत करत रोहितचा अडथळा दूर केला.

गुजरातच्या गोलंदाजांनी सूर्यकुमार यादवला फार काळ मैदानात टिकवू दिले नाही. मुंबई शतकाच्या उंबरठ्यावर असताना सांगवानने सूर्यकुमारला बाद केले. सूर्यकुमारने अवघ्या १३ धावा केल्या. त्यापाठोपाठ इशन किशनचाही संयम सुटला. तिलक वर्मानेही प्रभावी फलंदाजी केली. धाव चोरण्याच्या प्रयत्नात तिलक वर्मा धावचीत झाला. त्याने १६ चेंडूंत २१ धावांचे योगदान दिले. टीम डेवीडची बॅट गुजरातविरुद्ध चांगलीच तळपली. त्याने २१ चेंडूंत नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्यामुळे मुंबईच्या धावांची गती वाढली. मुंबईने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १७७ धावांपर्यंत मजल मारली. गुजरातच्या राशीद खानने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने ४ षटके फेकत अवघ्या २४ धावा देत २ बळी मिळवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -