मुंबई (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाकरीता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संचालनालयाचे दिनांक २० एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रान्वये दिनांक २९ एप्रिल २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याबाबत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सुधारित निर्देशांनुसार दिनांक १० मे २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे येथे काढण्यात आली होती. यानुसार दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लघुसंदेश (SMS) देखील पाठविण्यात आलेले आहेत.
निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता ही मुदतवाढ अंतिम मुदतवाढ असल्याने पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून दिनांक १० मे २०२२ पूर्वी आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे करण्यात आले आहे.