अलिबाग (वार्ताहर) : मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर रायगडमधील पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. रायगड जिल्ह्यातील मशिदींवरील भोंगे हे अधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. ज्या मशिदींनी अद्याप भोंग्यासाठी परवानगी घेतलेली नाही त्यांना परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे, असे रायगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात २६६ मशिदी आहेत. यापैकी २६१ मशिदींना पोलिसांकडून भोंगे लावण्यासाठी नियमानुसार अनुमती देण्यात आली आहे. दर दोन महिन्यांनी या परवानगीचे नुतनीकरण करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत अटी व शर्तींच्या आधीन राहून नियमानुसार ही परवानगी दिली जाते. त्यामुळे नियमानुसार बसविण्यात आलेले भोंगे हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
ज्या मशिदींनी भोंग्यासाठी अद्याप परवानगी घेतलेली नाही, त्यांना नियमानुसार परवानगी घेऊन भोंगे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणी नियमांचे उल्लंघन केलेच तर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी स्पष्ट केले.
पोलीस बंदोबस्तात वाढ
मंगळवारी साजरा करण्यात येणाऱ्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव दलासह, दंगल नियंत्रण पथके आणि शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
मुस्लीम समाजाचा हा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यात ७ शिघ्र कृती दल, २ दंगल नियंत्रण पथक, २ राज्य राखीव दलाच्या पथकांसह जिल्ह्यातील १७०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, तसेच २५० गृह रक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. दरम्यान रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत शांतता कमिट्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहनही पोलिसांमार्फत करण्यात आले आहे.
रायगड पोलीस क्षेत्रातील सर्व मशिदींना परवानगी घेऊनच भोंग्यांचा वापर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच या परवानगी दिल्या जातात. पुढील दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. परवानगी न घेता भोंग्यांचा वापर केल्यास किंवा वापर करताना नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. – अशोक दुधे, पोलीस अधीक्षक, रायगड