मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात सलग आठ पराभव पत्करल्यामुळे आता मोठे बदल अटळ असल्याचे संकेत मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धने याने दिले आहेत. तो पत्रकार परिषदेत बोलत होता.
जयवर्धने म्हणाला की, ‘फलंदाजी ही यंदाच्या हंगामातील अपयशाचे प्रमुख कारण आहे. फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवरही आमची कामगिरी खराब झाली. अनुभवी खेळाडूंनी याआधीच्या हंगामांमध्ये अनेकदा परिस्थितीनुरूप कामगिरी बजावली आहे. त्यामुळे संघाचा समतोल साधण्यासाठी बदलाची आवश्यकता असल्यास आम्ही ते नक्की करू,’ असे जयवर्धने म्हणाला.
कर्णधार रोहित शर्माकडून दर्जाला साजेशी फलंदाजी या हंगामात झालेली नाही. अनुभवी किरॉन पोलार्डही अपेक्षांची पूर्तता करू शकलेला नाही. सलामीवीर इशान किशनच्या खालावलेल्या कामगिरीबाबत जयवर्धनेने चिंता व्यक्त केली आहे. जयवर्धने म्हणाला, ‘इशान धावांसाठी झगडताना आढळत आहे. आम्ही त्याच्या नैसर्गिक खेळावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतो; परंतु आता त्याच्याशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे.’