सुखी जीवनासाठी घरदार, नोकरीधंदा, नातेवाईक सर्वच आवश्यक आहे. आपल्या शरीराला किती अवयव आहेत? पाच कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, अंतर्मन, सर्व या शरीरांत ठेवलेले आहे. पंचप्राण, सप्तधातू हेही शरीरात आहेत. या शरीरातून कुठला अवयव तुम्ही कमी करणार? पंचप्राण वजा केले तर शरीरांत काय उरणार? मन वजा केले, अंतर्मन वजा केले, हातपाय वजा केले तर शरीरांत काय उरणार? आपल्याला हे सर्व अवयव पाहिजे. हात, पाय, नाक, कान हे सगळे अवयव आहे, असे असूनही लोक शरीराची निंदा करतात व परमार्थाच्या, देवाधर्माच्या नावाखाली ते चुकीच्या मार्गाने जातात.
शरीराचे सर्व अवयव पाहिजेत तसे संसारात आई-वडील, बायका-मुले हे सर्व पाहिजे. यात आनंद आहे. तुम्ही म्हणाल संसारात अनेक अडीअडचणी आहेत, अनेक समस्या निर्माण होतात. संसारात प्रॉब्लेम्स येतात तेव्हा हे प्रॉब्लेम्स कुठे ही गेलात तरी येणारच. ते प्रॉब्लेम्स आपण सोडवले पाहिजेत. माझा एक सिध्दांत आहे. फार पूर्वी मी तो सांगितला होता तो म्हणजे संसार करणे हे तप आहे. ती एक तपचर्या आहे. तप करणारे लोक रानावनांत जायचे. तुम्ही हे वाचले असेल की साधूसंन्यासी रानावनांत जायचे, झाडाखाली तपचर्येला बसायचे. उन्हातान्हात वारापाऊस बसायचे. काही लोकांनी तर पंचाग्नी साधन केलेले आहे. त्यात चारही बाजूने अग्नी व डोक्यावर तळपता सूर्य याला पंचाग्नी साधन असे म्हणतात.
शरीराला ताप दिला की तप झाले असे त्यांना वाटते. उपवास करणे हेही तप आहे. भूक लागलेली असताना न खाणे, तहान लागलेली असताना पाणी न पिणे म्हणजे शरीराला त्रास दिला की ते तप झाले, असा एक समज झालेला आहे. शरीराला ताप देणे म्हणजे तप हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते शरीर साक्षात परमेश्वर आहे. त्याचीच सेवा करणे म्हणजे तप करणे. शरीररूपी परमेश्वराची सेवा केली तर ते तुम्हाला मेवा देईल. शरीराला ताप दिलात तर तुमचे जीवन उद्ध्वस्त होईल.आपण संसार करतो म्हणजे तपचर्या करतो. संसारात सहन करणे ही तपचर्या आहे. संसारात कितीतरी गोष्टी सहन कराव्या लागतात ही तपचर्या आहे. तप करायला दुसरे कुठे जाता तुम्ही. तप करणे म्हणजे एक प्रकारचा अभ्यास करणे. सहनशक्ती वाढविणे हा अभ्यास आहे. संसारात आपण कष्ट करतो हा सुध्दा एक अभ्यास आहे ही तपश्चर्या करणे अत्यंत आवश्यक असते. संसारात आनंदाने राहा हा जीवनविद्येचा सिध्दांत आहे. देव मिळण्यासाठी, देवाची प्राप्ती होण्यासाठी कुठेही जायला नको व कुठेही यायला नको. संसार करणे हीच एक तपचर्या आहे. जीवनांत आपल्याला अनेक प्रकारच्या प्रसंगाना सामोरे जावे लागते. आपल्याकडे जर सहनक्ती असेल तर आपला निभाव लागतो.
– सद्गुरू वामनराव पै