मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरमध्ये उष्णतेत वाढ झाली आहे. दरम्यान उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईकर एसी लोकलने प्रवास करत आहेत. त्यामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सध्या दररोज सरासरी मध्य रेल्वेवर १९ हजार, तर पश्चिम रेल्वे मार्गावर २१ हजार प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करत आहे.
यंदा मध्य रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आलेल्या आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी, २०२२ मध्ये मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून प्रति दिवस ७ हजार ८८३ प्रवासी प्रवास करत होते, तर फेब्रुवारी महिन्यात एसी लोकलची प्रवासी संख्याही ११ हजार २२९ वर जाऊन पोहपचली आहे. याशिवाय गेल्या महिन्यात दररोज १५ हजार ३५७ प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करत होते. मात्र, गेल्या महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे.
त्यामुळे दररोज मध्य रेल्वेवर १९ हजार ३३२, तर पश्चिम रेल्वे मार्गावर २१ हजार ७८५ प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करत आहेत. रेल्वेचा थंडगार प्रवास मिळण्यासाठी एसी लोकल सुरू केली. मात्र कमी फेऱ्या आणि जास्त भाडे यामुळे प्रवाशांनी एसी लोकलला पाठ दाखविली. पीक अव्हरमध्ये कोणी एसी लोकलमध्ये चढत नव्हते. त्यामुळे रिकाम्या एसी लोकल धावत होत्या. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून एसी लोकलला चांगली पसंती मिळत आहे.
तर दर सोमवारी एसी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्या एसी लोकलच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा या सेक्शनमध्ये ४४ फेऱ्या, हार्बरच्या सीएसएमटी ते पनवेल ८ फेऱ्या, पश्चिम हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव ८ फेऱ्या, अशा ६० फेऱ्या चालविण्यात येत आहेत.