शहापूर (वार्ताहर) : मानेखिंड ग्रामपंचायतीअंतर्गत दुर्गम भागात असलेल्या आष्टे कातकरी वाडी येथील आदिवासी कातकरी कुटुंबांवर हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरवर डोंगर-दऱ्या चढून खड्ड्यातील पाणी पिण्याची वेळ आली आहे. याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात श्रमजीवी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव सरचिटणीस प्रकाश खोडका यांनी दिला आहे.
मानेखिंड ग्रामपंचायतीअंतर्गत आष्टे कातकरीवाडीत ७० इतकी लोक वस्ती असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर नाही. दोन बोअरवेल असल्यातरी त्या कोरड्याठण्ण पडल्या आहेत़ परिणामी येथील महिलांना सुमारे ३ ते ४ किमी अंतरावरील डोंगर-दऱ्या चढून नजीकच्या खोल दऱ्यामध्ये खड्ड्यातील पाण्यासाठी शोध मोहीम घ्यावी लागत आहे. या खड्ड्यातील पाण्याने सध्या तहान भागविण्याची वेळ आली आहे. यामध्ये प्रचंड वेळ आणि महिलांची पायपीट होत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तर बोअरिंगमध्ये सकाळच्या वेळेत येणारे थोडेफार पाणी दूषित असून वयोवृद्ध महिलांना याच पाण्यावर आपली तहान भागविण्याची वेळ आली आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत़ परंतु सध्या पिण्यासाठी पाणीच नसल्याने त्यांना नाईलाजास्तव तेच पाणी वापरात आणावे लागत आहे. मागील वर्षी या वस्तीसाठी पाण्याची टाकी बसविण्यात आली होती. त्यामध्ये टँकरने पाणी टाकून येथील वस्तीची तहान भागविली जात होती. मात्र यावर्षी आजमितीस एकदाच ग्रामपंचायतीने टॅंकरने पाणी टाकले त्यानंतर पंचायत समितीकडून हिरवा कंदील न मिळाल्याने पाणी टाकणे बंद केल्याचे प्रकाश खोडका यांनी सांगीतले.
एकीकडे तालुक्यात प्रचंड जलसाठे असून १०० किमी अंतरावरील मुंबईकरांना अहोरात्र पाणीपुरवठा होत असताना जलसाठ्यानजीकच्या वस्तीला मात्र पाण्यासाठी खड्ड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. ही सामाजिकदृष्ट्या मोठी शोकांतिका असल्याचे चित्र तालुक्याच्या दुर्गम भागात प्रत्ययास येत आहे. त्यासाठी प्रशासनाने किमान मार्च ते मे अखेरीस तरी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.