Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरराष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन

२ लाख ७६ हजार ६९३ मुलांना होणार लाभ; जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये राबवणार मोहीम

बोईसर (वार्ताहर) : मुले निरोगी व सुदृढ राहावी यासाठी पालघर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील वय वर्ष १ ते १९ या वयोगटातील २ लाख ७६ हजार ६९३ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. ही मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व आश्रम शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यामधील जव्हार, मोखाडा, वाडा, वसई, पालघर या पाच तालुक्यांमधे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम २५ एप्रिल रोजी तर मॉपअप दिवस २९ एप्रिल रोजी राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामिण भागातील १ ते ६ वयोगटातील ९३ हजार ८४० लाभार्थी आणि ६ ते १९ वयोगटातील १ लाख ८२ हजार ८५३ लाभार्थी आहेत, असे एकूण २ लाख ७६ हजार ६९३ मुलांना लाभ मिळणार आहे.

१ ते १९ वयोगटातील लाभार्थ्यांना अम्बेडेझॉलची गोळी (जंतनाशक) देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १ ते ६ वयोगटातील सर्व मुलांना अंगणवाडी केंद्रस्तरावर व ६ ते १९ वयोगटातील सर्व मुलांना शाळा, आश्रमशाळा इत्यादी ठिकाणी वयोमानानुसार जंतनाशक गोळ्या देण्यात येतील.

याद्वारे मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश साध्य करण्याचे काम करण्यात येत आहे. ही मोहीम जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा इत्यादींमध्ये राबवण्यात येणार आहे. तसेच २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत शाळाबाह्य मुलांसाठी आशा कार्यकर्त्यांमार्फत जंतनाशक गोळ्या घरी जाऊन देणात येणार आहेत.

जंतनाशक गोळीचे दुष्परिणाम नाहीत

जंतनाशक गोळी खाल्ल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचितप्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -