मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामातील सोमवारच्या (२५ एप्रिल) लढतीत पंजाब किंग्जविरुद्ध फॉर्मात परतलेला गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान आहे.
पंजाब आणि चेन्नई संघ तळाला आहेत. पंजाबने ७ सामन्यांतून तीन विजय (६ गुण) मिळवलेत. गुणतालिकेत ते आठव्या स्थानी आहेत. ७ सामन्यांत केवळ दोन पराभव हाती लागलेल्या (४ गुण) रवींद्र जडेजा आणि सहकारी नवव्या स्थानावर आहेत. पंजाबने आश्वासक सुरुवात करताना पहिल्या तीन सामन्यांत दोन विजय मिळवले. मात्र, पुढील चार सामन्यांत त्यांना तीन पराभव पाहावे लागले आहेत. त्यात सलग दोन आहेत.
सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांना मात खावी लागली. आता सलग तिसरा पराभव टाळण्याचे आव्हान आहे. चेन्नईच्या तुलनेत पंजाबची कामगिरी थोडी चांगली असली तरी मागील तीन सामन्यांत दोन विजय मिळवत दमदार पुनरागमन करणाऱ्या गतविजेत्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सलग चार पराभवांची नामुष्की ओढवलेल्या सुपरकिंग्जनी बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सना हरवत पहिला विजय नोंदवला तरी गुजरात टायटन्सविरुद्ध पुन्हा मात खावी लागली. परंतु, माजी विजेता मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील मागील तिसऱ्या सामन्यातील दुसरा विजय पाहता चेन्नई संघांचा आत्मविश्वास उंचावला आहे. पंजाबने त्यांच्यापेक्षा एक विजय अधिक मिळवला असला तरी चेन्नईसमोर सातत्य राखण्याचे आव्हान आहे.
फलंदाजीत लियाम लिव्हिंगस्टोन तसेच गोलंदाजीत राहुल चहरने सातत्य राखले तरी कर्णधार मयांक अगरवाल, अनुभवी सलामीवीर शिखर धवन, जॉनी बेअर्स्टो, ऑडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, एम. शाहरूख खान तसेच वेगवान कॅगिसो रबाडा, अष्टपैलू अर्शदीप सिंग आणि ऑडियन स्मिथ, वरुण अरोरा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
या सर्वांचे अपयश किंग्जच्या ढेपाळलेल्या कामगिरीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे लिव्हिंगस्टोन आणि चहरला अन्य सहकाऱ्यांची साथ मिळाली तर पंजाबला पराभवांची मालिका खंडित करण्याची संधी आहे.
सांघिक कामगिरीतील असातत्य चेन्नईसाठी चिंतेची बाब आहे. शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पाने थोडी छाप पाडली तरी युवा ओपनर ऋतुराज गायकवाड, अंबती रायुडू, कर्णधार रवींद्र जडेजा, अष्टपैलू ड्वायेन ब्राव्हो आणि मोईन अलीने निराशा केली आहे. ब्राव्होचा फलंदाजीतील क्रमांक चुकीचा ठरतोय. मात्र, त्याने बॅटिंगमधील कसर गोलंदाजीत भरून काढली आहे. परंतु, मुकेश चौधरी थोडा ओके आहे. मात्र, वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन, महिषा तीक्ष्णा या प्रमुख परदेशी गोलंदाजांना अपेक्षित बॉलिंग करता आलेली नाही.
मुंबईविरुद्ध माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दाखवलेल्या संयमी फलंदाजीतून अन्य बॅटर्सनी बोध घेण्याची गरज आहे. परिणामी, विजयी कामगिरी कायम ठेवायची असल्यास चेन्नईच्या सर्वच प्रमुख क्रिकेटपटूंना वैयक्तिक खेळ उंचवावा लागेल.
वेळ : रा. ७.३० वा. ठिकाण : वानखेडे स्टेडियम