Thursday, March 20, 2025
Homeमहामुंबईराज्यात जागतिक नेते का नाही येत?

राज्यात जागतिक नेते का नाही येत?

शरद पवारांनीच आत्मचिंतन करण्याचे फडणवीसांचे प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात येणाऱ्या जागतिक नेत्यांना गुजरातमध्ये नेऊन स्वत:च्या राज्याचा विकास करतात’, या शरद पवार यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘महाराष्ट्रात कोणीही यायला का तयार नाही, या गोष्टीचे आत्मचिंतन शरद पवार यांनीच करायला पाहिजे. पाच वर्षांनंतर महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू झाले आहे. राज्यातील दोन मंत्री तुरुंगात आहेत. अशा अवस्थेत महाराष्ट्रात कोण येणार आहे?’, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ते रविवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी मॉरिशिअसच्या पंतप्रधानांना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित केला. ‘मॉरिशिअसचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक उपसचिव पाठवून देण्यात आला. अशा पाहुण्यांसाठी जी आलिशान गाडी द्यावी लागते, ती गाडीदेखील पाठवण्यात आली नाही. त्यांच्यासाठी साधी गाडी पाठवण्यात आली. जर एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात अशी वागणूक मिळणार असेल तर कोण कशाला महाराष्ट्रात येईल?’ असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

हनुमान चालिसा पाकमध्ये जाऊन बोलायची का?…

यावेळी फडणवीस यांनी राणा यांच्यासंदर्भातही भाष्य केले. ‘हनुमान चालिसा बोलू, असे म्हणणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी जाऊन अटक केली जाते. आता हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानमध्ये बोलणार का? पोलिसांनी एका महिलेला रात्रभर कोठडीत ठेवले. एका महिलेला घाबरून शिवसैनिकांना तिच्यावर हल्ला करायला सांगण्यात आला’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पोलिसांवर कारवाई व्हावी…

देवेंद्र फडणवीस यांनी खार पोलीस ठाण्याबाहेर किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबतही भाष्य केले. कालचा प्रकार मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी गोष्ट होती. झेड सुरक्षा असलेली व्यक्ती कळवून पोलीस ठाण्यात येते. आपल्यावर हल्ला होईल, असे पोलिसांना सांगते. त्यानंतरही या व्यक्तीवर हल्ला होतो. यामधून दोनच अर्थ निघतात. एकतर पोलिसांचे या हल्ल्याला समर्थन होते किंवा पोलीस इतके अकार्यक्षम झाले आहेत की, ते हल्ला रोखू शकत नाहीत. झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या संरक्षणात हयगय करणे हे गैरवर्तन आहे. त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा कोणीही सुरक्षित राहणार नाही’, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -