Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखहनुमान चालिसावरून सरकारची नाचक्की

हनुमान चालिसावरून सरकारची नाचक्की

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील वांद्रे पूर्व कलानगर येथील मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्याची अखेर कोठडीत रवानगी झाली. नवनीत राणा या खासदार आहेत आणि त्यांचे पती रवी राणा हे आमदार आहेत. हे दाम्पत्य अमरावतीमधून अपक्ष म्हणून निवडून आले आहे. केंद्रातील भाजप सरकारशी त्यांची जवळीक आहे हे सर्वश्रूत आहे म्हणून ते आपले राजकीय शत्रू आहेत या भूमिकेतून ठाकरे सरकार वागत आहे, असे चित्र गेल्या दोन दिवसांत बघायला मिळाले. नवनीत राणा व रवी राणा हे उत्तम वक्ते आहेत. नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या ताकदवान नेत्याचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला, त्याचा वचपा तर ठाकरे सरकार त्यांच्यावर पोलीस कारवाई करून काढत नाही ना? राज्यात सरकार आमचे आहे, पोलीस बळाचा वापर करून आम्ही काहीही करू शकतो, असे ठाकरे सरकार विरोधकांना वारंवार दाखवत आहेत. राणा दाम्पत्यांने समाजात तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक वक्तव्ये केली, अशा आरोपावरून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. विरोधी पक्षांनी सरकार विरोधात आंदोलन करू नये यासाठी राणा दाम्पत्यावर कठोर कलमे पोलिसांनी लावली असावीत. ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान व राणा दाम्पत्याचे खार येथील निवासस्थान येथे दोन दिवस खूप मोठा पोलीस बंदोबस्त होता. या दोन्ही ठिकाणी शिवसैनिक जमले होते व ते राणा दाम्पत्यांच्या नावाने शिमगा करीत होते, त्यांच्या नावाने हाय हाय घोषणा देत होते, ते मातोश्रीवर आले, तर आम्ही त्यांना देण्यासाठी प्रसाद तयार ठेवला आहे, अशी धमकी वारंवार देत होते. नागपुरात असलेल्या संजय राऊत यांनी तर त्यांना वीस फूट जमिनीत गाडण्याची भाषा केली. मातोश्रीच्या नादाला लागायचे नाही, असा दम दिला. अगोदर स्मशानात गोवऱ्या रचून या अशी भाषा वापरली. हीच शिवसेनेची भाषा आहे असे बजावले. अनिल परब हे तर सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनीही राणा दाम्पत्यांना धमकीची भाषा वापरली. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी शिवसेनेचे नेते तसे बोलत असावेत. पण उद्धव यांनाही त्यांना समज द्यावी, असे वाटले नाही. याचा दुसरा अर्थ राणा दाम्पत्याला ज्या धमक्या दिल्या जात होत्या त्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन होते का? मातोश्रीवर ठिय्या मारून बसलेल्या शिवसैनिकांना भेटायला मुख्यमंत्री थेट वर्षावरून आले व त्यांनी त्यांचे आभार मानले. हे आभार कशासाठी मानले? त्यांनी अशी काय मर्दुमकी गाजवली होती? दोन दिवस वांद्र्यातील मुख्य रस्ता अडवून बसलेल्या शिवसैनिकांची पाठ थोपटण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले, पण यातून संदेश काय जातो याचे ते भान विसरले असावेत. कोविड काळात मुख्यमंत्री राज्यात कुठेही फिरले नाहीत, अडीच वर्षांत केवळ दोन वेळा राज्याच्या प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात मुख्यमंत्री जात, ही त्यांची कामगिरी म्हणायची का? पण आपल्या घरासमोर हनुमान चालिसा वाचला जाणार अशी राणा दाम्पत्याने घोषणा करताच, तेथे जमलेल्या शिवसैनिकांना भेटायला ते तत्परतेने गेले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, इतरांचे काही का होईना, तसाच हा प्रकार होता.

मुळात मातोश्रीवर गेल्या कित्येक वर्षांपासून पोलीस बंदोबस्त आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर तो वाढविण्यात आला. पोलिसांच्या गाड्या व बॅरिकेट्स लावली गेली. शिवसेनेचा, शिवसैनिकांचा व ठाकरे सरकारचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का? ते मातोश्रीला सुरक्षा देऊ शकणार नाहीत असे ठाकरे सरकारला वाटते का? शिवसेना भवनात गाजावाजा करून घेतलेली पत्रकार परिषद असो किंवा मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार म्हणून दिलेला राणा दाम्पत्याचा इशारा असो, लगेचच शिवसैनिक तेथे जातात व ठिय्या मांडून बसतात. सेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसैनिकांना कामधंदा, रोजगार, नोकरी काहीच नाही का? सगळे रजा टाकून येतात की सुट्टी घेऊन येतात की सगळे रिकामेच आहेत? मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची, अशी घोषणा ठाकरे परिवारातील युवा नेत्याकडून मातोश्रीवर वारंवार दिली जात होती. घरातील माणूस मुख्यमंत्री असताना घरातील लोकांना अशी घोषणा देण्याची का पाळी येते? राणा दाम्पत्य दोन दिवस घरातून बाहेर पडले नाही, पंतप्रधान मुंबईत येणार म्हणून त्यांनी हनुमान चालिसा वाचण्याचा कार्यक्रम मागे घेतल्याचे जाहीर केले. पण पोलिसांनी त्यांना घरात जाऊन अटक केली. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री व नेते यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, त्या पोलिसांनी बघितल्या नाहीत व ऐकल्याही नाहीत याचे मोठे आश्चर्य वाटते. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी व अटक करण्यासाठी ठाकरे सरकारने पोलीस दलाची सर्व ताकद पणाला लावली हे सरकारला लाजिरवाणे आहे. शिवसैनिकांनी मातोश्री व खार येथे केलेले ठिय्या आंदोलन आणि मुंबई पोलिसांनी केलेली कारवाई यातून राणा दाम्पत्याला दोन दिवस अफाट प्रसिद्धी मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर कारवाई करताना सरकार तोंडघाशी पडले होतेच. कंगना रणावत, अर्णब गोस्वामी, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करतानाही सरकारचीच गोची झाली. विकासकामांपेक्षा व जनकल्याणाचे कार्यक्रम राबविण्याऐवजी ठाकरे सरकारचा वेळ विरोधकांना चेपण्यातच खर्च होत आहे. आता हनुमान चालिसावरून ठाकरे सरकारची नाचक्की झाल्याचे जनतेला बघायला मिळाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -