मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या ‘सॅटर्डे स्पेशल’ (२३ एप्रिल) दुसऱ्या लढतीत ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स हे फॉर्मात असलेले संघ आमनेसामने आहेत. हैदराबादला सलग पाचव्या विजयाची संधी आहे. दुसरीकडे, बंगळूरु संघही विजयात सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
बंगळूरुने ७ सामन्यांतून ५ विजयांसह (१० गुण) ताज्या गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. गुजरातनंतर दहा पॉइंट्स मिळवणारा तो केवळ दुसरा संघ आहे. रॉयल चॅलेंजर्सना १५व्या हंगामात सलग दुसऱ्या विजयी हॅटट्रिकची संधी आहे. मात्र, प्रतिस्पर्धी संघही फॉर्मात आहे. हैदराबादला ६ सामन्यांतून ८ गुण मिळवता आलेत. अपयशी सुरुवातीनंतर सलग चार विजय मिळवत सनरायझर्सनी अव्वल चार संघांत स्थान मिळवण्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.
राहुल त्रिपाठीसह (एक शतक, एक अर्धशतक) आयडन मर्करम (२ अर्धशतके) तसेच वेगवान गोलंदाज टी. नटराजन (१२ विकेट), उम्रान मलिक (९ विकेट) आणि भुवनेश्वर कुमारने (८ विकेट) हैदराबादच्या सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. मात्र, फलंदाजीत कर्णधार केन विल्यमसन, निकोलस पूरन, अभिषेक शर्मा तसेच गोलंदाजीत ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर, मार्को जेन्सन यांना अधिक योगदान द्यावे लागेल.
बंगळूरुसाठी फाफ डु प्लेसिस (दोन अर्धशतके), दिनेश कार्तिक, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल (प्रत्येकी एक अर्धशतक) तसेच वहिंदु हसरंगा (११ विकेट), जोश हॅझ्लेवुड आणि हर्षल पटेल (प्रत्येकी ८ विकेट) विजयाचे तारणहार ठरले आहेत. मात्र, माजी कर्णधार विराट कोहली फॉर्मसाठी झगडतोय. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचीही तशीच अवस्था आहे. उभय संघ फॉर्मात आहेत. मात्र कामगिरीत सातत्य राखायचे असेल, तर त्यांच्या प्रमुख क्रिकेटपटूंना मोठे योगदान द्यावे लागेल.
सनरायझर्सकडे निसटती आघाडी, पण…
उभय संघांतील मागील पाच आयपीएल लढतींचा विचार केल्यास सनरायझर्सनी बंगळूरुवार ३-२ अशी निसटती आघाडी घेतली आहे. मात्र, गत हंगामातील पहिल्या सामन्यात बाजी मारताना बंगळूरुने प्रतिस्पर्ध्यांना सलग तिसऱ्या विजयापासून रोखले.
वेळ : दु. ७.३० वा. ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम