नवी मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शुक्रवारी (२३ एप्रिल) गुजरात टायटन्सशी दोन हात करताना माजी विजेता कोलकाता नाइट रायडर्ससमोर पराभवाचा ‘चौकार’ टाळण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, फॉर्म हरवलेल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून १५व्या मोसमात दुसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक नोंदवण्याची संधी टायटन्सला आहे.
ताज्या गुणतालिकेत ६ सामन्यांनंतर ५ विजयांसह १० गुणांसह गुजरातने अव्वल स्थान राखले आहे. दहा गुण (डबल फिगर) मिळवणारा तो यंदाच्या हंगामातील केवळ दुसरा संघ आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने कमालीचे सातत्य राखले आहे. सलग तीन सामने जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने त्यांची विजयी मालिका खंडित केली. मात्र, राजस्थान रॉयल्स आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्जना हरवून त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे तुलनेत फॉर्मात नसलेल्या कोलकाताविरुद्ध टायटन्सचे पारडे जड आहे.
गुजरातसाठी आघाडीच्या फळीतील शुबमन गिलसह कर्णधार हार्दिक पंड्याचा फॉर्म फलंदाजीतील जमेची बाजू ठरला आहे. या दोघांना ओपनर डेव्हिड मिलरची थोडी फार साथ मिळाली आहे. तरीही मॅथ्यू वेड, विजय शंकर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर यांना फलंदाजीत अपेक्षित योगदान देता आलेले नाही. गोलंदाजी तितकी सर्वसमावेशक नसली तरी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन तसेच लेगस्पिनर राशिद खानने थोडा अचूक मारा केला आहे. तरीही गोलंदाजी प्रभावी ठरण्यासाठी प्रमुख गोलंदाजांना आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. सलग विजय पाहता गुजरातचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र सातत्य राखताना सर्वच क्रिकेटपटूंचा कस लागेल.
श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखालील कोलकाताची यंदाच्या हंगामातील कामगिरी संमिश्र राहिली आहे. पहिल्या चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळवण्यात यश आले तरी मागील तीन सामन्यांत अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स अशा तीन प्रतिस्पर्धींविरुद्ध ओळीने तीन पराभव पाहावे लागले. त्यांच्या खात्यात ७ सामन्यांतून ६ गुण (३ विजय) आहेत. सध्या पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी असलेल्या नाइट रायडर्सना वरचे स्थान मिळवायचे असल्यास विजय आवश्यक आहे. मात्र, फॉर्मात असलेल्या गुजरातविरुद्ध त्यांची मोठी परिक्षा असेल. मागील तीन सामन्यांतील पराभव पाहता श्रेयस आणि कंपनीला सर्व आघाड्यांवर खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे.
कॅप्टन श्रेयसने दोन तसेच अष्टपैलू आंद्रे रसेल, आरोन फिंच, सॅम बिलिंग्ज, नितीश राणा आणि वेंकटेश अय्यरने एकेकदा पन्नाशी पार केली तरी बॅटिंगमधील असातत्य पराभवाला कारणीभूत ठरत आहे. अनुभवी अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन यांनी निराशा केली आहे. बॉलर्समध्ये उमेश यादवने थोडी छाप पाडली तरी अनुभवी ऑफस्पिनर सुनील नरिन, वेगवान गोलंदाज टिम साउदी, पॅट कमिन्स, आंद्रे रसेल, सी. वरूण यांना अद्याप छाप पाडता आलेली नाही.
वेळ : दु. ३.३० वा. ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम