मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील रस्त्यांची पालिकेकडून दुरुस्ती सुरू असल्यास रस्ते बंद केले जातात; मात्र आता या बंद रस्त्यांची माहिती मुंबईकरांना गुगल मॅप वर मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेचे जे रस्ते दुरुस्ती कामांसाठी बंद ठेवण्यात येतील, त्यांची माहिती अग्रीम स्वरूपात ‘गुगल’ला अधिकृतपणे कळविण्यात येणार आहे. यामुळे ‘गुगल मॅप’ वर रस्ता शोधतेवेळी रस्ता बंद असल्याचे नागरिकांना सहजपणे कळणार आहे. तसेच बंद असलेल्या रस्त्याला पर्यायी मार्ग देखील ‘गुगल मॅप’द्वारे दर्शविला जाणार आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जे रस्ते विविध दुरुस्ती कामांसाठी किंवा स्थापत्य कामांसाठी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार बंद असतील, त्यांची माहिती महानगरपालिकेद्वारे अधिकृतपणे ‘गुगल’ला लेप्टन या संस्थेच्या सहकार्याने कळविण्यात येणार आहे. ही माहिती कळविल्यानंतर त्या पुढील २४ तासांमध्ये ही माहिती ‘गुगल मॅप’वर अद्ययावत करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने चाचणी स्वरुपात दक्षिण मुंबईतील ‘गणपतराव कदम मार्ग’ येथे सुरू असलेल्या कामांची माहिती ‘गुगल’ला कळविण्यात आली होती. ज्यामुळे आता या ठिकाणी लाल रंगातील ठळक ठिपक्यांची रेषा दिसत आहे. या रेषेवर ‘क्लिक’ केल्यानंतर हा रस्ता बंद असल्याचा कालावधी देखील दिसत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर, आता याच धर्तीवर भविष्यात जे रस्ते बंद असतील, त्यांची माहिती ‘गुगल’ला कळविण्यात येणार आहे.