मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी मुंबई महापालिकेची विविध स्तरावर कामे सुरू असून या कामांची नियमित पाहणी करण्यात यावी असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी मंगळवारी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. दरम्यान पावसाळ्याच्या पूर्व तयारीसाठी पालिका अधिकाऱ्यांची बैठक देखील घेण्यात आली होती.
ही बैठक अश्विनी भिडे आणि मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान मुंबईतील २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपापल्या क्षेत्रात सुरू असलेल्या कामांची नियमितपणे पाहणी करण्याचे आदेश भिडे यांनी दिले आहेत. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने व्हावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे; पाऊस सुरू असताना वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सुरळीतपणे व अव्याहतपणे सुरू राहावी याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळच्या वेळी करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
तर पावसाळ्या दरम्यान झाड पडल्यास याबाबत दरवर्षीच्या पद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी उद्यान खात्याला दिले आहेत. त्यासोबतच दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागांमध्ये संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. धोकादायक इमारतींबाबत ‘सुनिश्चित कार्यपद्धती’नुसार निर्धारित कार्यवाही पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करावी, असेही आदेश त्यांनी संबंधित खात्याला देण्यात आले आहेत.