गौसखान पठाण
सुधागड-पाली : सुधागड तालुक्यातील आपटवणे गावच्या हद्दीत असलेल्या ओव्हळात औषध-गोळ्यांच्या हजारो पाकिटांचा खच टाकण्यात आला आहे. मंगळवारी (ता. १९) येथील सरपंच शरद चोरघे आणि ग्रामस्थांनी ही बाब निदर्शनास आणली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
ग्रामीण भागात रुग्णांवर उपचारासाठी सरकारमार्फत शासकीय रुग्णालयांना पुरवण्यात आलेल्या कॅल्शियम व गर्भनिरोधक गोळ्यांची ही पाकिटे आहेत. ही हजारो पाकिटे त्यांची योग्य विल्हेवाट न लावता अशा प्रकारे निष्काळजीपणे फेकून दिलेली आहेत.
लहान मुले व जनावरे यांनी हे औषधे खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय, येथील पर्यावरणालादेखील हानी पोहोचू शकते. मागील वर्षी अशाच प्रकारे गाठेमाळ आदिवासी वाडीजवळ मुदत न संपलेल्या आयर्न आणि फॉलिक अॅसिड सिरपच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या.
अशाप्रकारे औषधे टाकून देणे योग्य नाही. आरोग्य विभागाने औषधे गरजूंना देणे आवश्यक होते किंवा शास्त्रीय पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. याबाबत दोषींवर कारवाई करण्यात यावी.
– शरद चोरघे, सरपंच, ग्रुप ग्रा.पं. आपटवणे
याबाबत चौकशी केली जाईल. तसेच जो दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
– डॉ. शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड