अलिबाग (प्रतिनिधी) : तब्बल साडेपाच महिन्यांच्या संपानंतर रायगड जिल्हयातील एसटी कर्मचारी हळूहळू कामावर रूजू होत आहेत. आज अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग साधत अलिबाग एसटी आगारातील जवळपास २०० कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे आगामी दोन-चार दिवसांत अलिबाग आगाराची सेवा पूर्वपदावर येईल. सकाळी साडेनऊ वाजता ठरल्याप्रमाणे कर्मचारी अलिबाग स्थानकात एकत्र जमले. जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सारेजण आगारातील गणपती मंदिरात पोहोचले. तेथे अंगारकीनिमित्त अभिषेक, पूजाअर्चा झाली महाआरतीनंतर सर्वजण कामावर हजर होण्यासाठी गेले.
आज कामकाजानुसार १०० कर्मचाऱ्यांना आगारप्रमुख अजय वनारसे यांनी हजर करून घेतले. ज्या ९० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यांनी अपीलाचे अर्ज सादर केले ते विभाग नियंत्रकांकडे पाठवण्यात आले. तसेच सेवासमाप्ती झालेल्या १४ जणांनीही पुन्हा सेवेत घेण्यासाठी अर्ज दिले आहेत. त्यांनाही लवकरच सेवेत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. पुढील काही दिवसांत अलिबाग आगाराची सेवा पूर्वपदावर येईल, असा आशावाद एसटीचे अधिकारी व्यक्त करत आहेत.
गेली साडेपाच महिने आम्ही दुखवटा पाळला होता. संविधानिक मार्गाने लढाई पूर्ण करून आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार आज कामावर हजर होत आहोत. संपकाळात एसटीचा कर्मचारी झुकला नाही. प्रशासनाने दिलेल्या अल्टिमेटमला आमचा कर्मचारी लाचारी पत्करून घाबरला नाही. आम्ही काय जिंकलो, काय हरलो यापेक्षा या काळात सन्मानाने जगायला शिकलो, ही आमच्यासाठी मोठी बाब आहे. – प्रसन्ना पाटील, कर्मचारी
एसटी महामंडळ तोट्यात आहे, असे सांगितले जाते. त्याला काही कर्मचारी जबाबदार नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र, यापुढे एसटी कशी फायद्यात येईल, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आमचे हक्क आम्ही मिळवून घेऊ, असा संकल्प आज पुन्हा कामावर रूजू होताना सोडत आहोत.– अर्चना अबू, कर्मचारी
आज अलिबाग आगारातील बरेचसे कर्मचारी हजर झाले. त्यातील बडतर्फ व निलंबित कर्मचाऱ्यांचे अपील विभाग नियंत्रकांकडे पाठवण्यात आले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांना हजर करून घेण्यात आले आहे. चालकांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा प्रत्यक्ष सेवेवर पाठवले जाईल. त्यामुळे पुढील दोन-चार दिवसांत अलिबाग आगाराचे कामकाज पूर्ववत सुरू होईल. – अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग