Monday, July 22, 2024
Homeकोकणरायगडउरणमधील गुटखा विक्रेत्यांना अभय कोणाचे?

उरणमधील गुटखा विक्रेत्यांना अभय कोणाचे?

जिल्ह्यात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, मात्र उरणमध्ये खुलेआम विक्री

उरण (वार्ताहर) : सध्या देशासह महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. मात्र उरण तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढेच नाही, तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून तालुक्यातील खेड्यापाड्यांत गुटखा पुरविण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्रीवर बंदी आणली. मात्र ही बंदी कागदावरच असल्याचे दिसून आले आणि असाच गुटखा व्यवसाय तालुक्यात जोरात सुरू आहे.

पोलीस आणि अन्नप्रशासन विभागाच्या आशीर्वादाने या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत असताना मात्र उरणमध्ये कारवाई होताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तालुक्यात होलसेल गुटखा विकला जात आहे. विशेष म्हणजे, भरदिवसा दुचाकीवर बॉक्स टाकून बिनधास्त लागेल त्याला माल पुरवला जातो. संबधित खात्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांशी विक्रेत्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई होण्याची चिंता नाही. त्यामुळे गुटखा विक्रेता दिवस-रात्र गुटखा विक्री करत आहे, असा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गुटखा विक्रेत्यांना पकडण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र उरणमध्ये दररोज लाखो रुपयांच्या गुटख्याची विक्री होत असताना त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांना अभय दिले जात आहे. उरणमध्ये अनेकजण खुलेआम गुटखा विक्री करत आहेत. विक्रेते ज्यावेळी वर्दळ कमी असते त्यावेळी बाहेरून गुटखा मागवून गाडी इतर ठिकाणी उभी करून माल खाली करत असतात. तसेच आम्ही आर्थिक हितसंबंध जपत असल्याने आमच्यावर कारवाई होण्याची शक्यता नसल्याची दर्पोक्ती गुटखा विक्रेते करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -