डॉ. लीना राजवाडे
सुजाण वाचक हो, आजचा लेख आजमितीला आपण आरोग्यं धनसंपदा या लेखमालेत आरोग्य याविषयी जे काही वाचले त्याविषयी उजळणी स्वरूपाचा आहे.
इंग्रजी नववर्षाच्या सुरुवातीला आरोग्याचा झेंडा घेऊन आपण पुढील आयुष्याची वाटचाल करायचा निश्चय केला. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या चैत्र महिन्यात होते त्या पाडव्यापर्यंत आपण या आरोग्य संकल्पनेची व्याप्ती किती आहे हे समजून घेतले. त्यातील महत्त्वाच्या विषयांची ही उजळणी आहे. तेव्हा माझ्याबरोबर आपल्यापैकी प्रत्येकाने मी नेमके यात स्वत:साठी काय नक्की लक्षात घ्यायचे आहे हे मुद्दे पुन्हा एकदा ध्यानात घेऊयात.
- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ साधण्याचे उत्तम आरोग्य किंवा स्वास्थ्य हे मुख्य साधन आहे.
- ज्या माणसाचे शरीर उत्साही आणि मन प्रसन्न असते, त्याला स्वस्थ म्हणतात.
- स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं म्हणजेच स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य जाणीवपूर्वक सांभाळणे हे वैद्यकशास्त्राचे मूळ प्रयोजन आहे.
- आरोग्याची मदार ही योग्य आहार (खाणे-पिणे), निद्रा (झोप) आणि ब्रह्मचर्य या तीन खांबावर अवलंबून असते.
- सुखी आनंदी आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी शारीरिक आणि मानसिक ताकद महत्त्वाची आहे.
- मेंदू आणि मन यांचा संबंध मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
- योग्य प्रमाणात भूक लागल्यावर खाल्लेले अन्न किंवा आहार शरीराची ताकद वाढवतो.
- सुदृढ शरीर आणि प्रसन्न मन यांचा योग्य मेळ हा सुखी आयुष्याचा मूलमंत्र आहे.
- शारीरिक आणि मानसिक ताणाचे योग्य नियोजन हे आवश्यक आहे.
- श्वास यंत्रणा ही शरीर, मन आणि वाणी तीनही स्तरावरील ऊर्जा नियंत्रणात ठेवते. योग्य पद्धतीने श्वास उच्छवास करण्याचा सजगतेने अभ्यास करायला हवा. स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचा हा विनाशुल्क फायदेशीर मार्ग आहे.
- आयुष्य हे प्राणशक्तीच्या ताब्यात आहे.
- ताजे पोषक अन्न, शुद्ध स्वच्छ पाणी हे आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे तशीच स्वच्छ हवा ही देखील आवश्यक आहे.
- स्वस्थवृत्त म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या या स्वत:साठी स्वत:हून पाळायच्या शिस्तबद्ध सवयी माणसाला आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा मार्ग दाखवतात.
- वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्य या दोनही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत.
सारांश स्वत:ची देखभाल करताना वरील सर्व गोष्टी माझ्या आरोग्याशी निगडित आहेत. ‘मीच आहे माझ्या आयुष्याचा शिल्पकार’ हे नक्की करूयात. सुधारणात्मक, नियोजनात्मक, भविष्यसूचक आणि प्रतिबंधात्मक यांपैकी कोणताही दृष्टिकोन असो विधायक पाऊल पुढे टाकूयात.
आरोग्यासाठी गुंतवणूक करण्याचा संकल्प विचारात आहे तो हळूहळू कृतीत आणूयात.
यापुढील काही लेखांतून आहार याविषयी अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करू.
सर्वांना सुख लाभावे,
जशी आरोग्य संपदा.