Friday, July 11, 2025

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात
सुनील सकपाळ

देवाला भेटण्यासाठी देवाच्या मूळ अस्तिव असलेल्या जागीच जावं लागतं, असं म्हणतात. महाराजांच्या रायगडाला भेट म्हणजे जणू देवाला जवळून भेटण्याची संधीच. ही संधी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई मंडळ आणि मुंबई मराठी साहित्य संघ - नाट्यशाखा रंगमंच सहयोगाने नाट्यरसिकांना १८ एप्रिलला मिळणार आहे ती ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या निमित्ताने...


वसंत कानेटकर लिखित, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे मराठीमध्ये हजारो प्रयोग झाले आहेत. मराठी नाट्यसृष्टीतील अतिशय दिग्गज कलाकारांनी या नाटकाला न्याय दिला आहे. आता नव्या संचात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रायगडावर १८ एप्रिलला ‘वारसा’ दिनाच्या निमित्ताने रंगणार आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८ एप्रिल २०२२ रोजी सायं. ६.१५ वा. विशेष कार्यक्रम रायगड किल्ल्यावर आयोजित केला आहे.


मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा प्रयोग विनामूल्य सादर केला जाणार आहे. या नव्या संचात प्रमोद पवार, यश कदम, उपेंद्र दाते, मोहन साटम, सुभाष भागवत, चिन्मय, मयूर भाटकर, संध्या वेलणकर व अनिता दाते हे कलाकार असून याचे दिग्दर्शन उपेंद्र दाते यांनी केले आहे. नव्या शुभारंभानंतर नाटकाचे महाराष्ट्रासह गोवा, इंदूर असे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.


इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो, तर तो अनुभवायलादेखील लागतो. आपला इतिहास आपणच जपायचा असतो. हाच इतिहास जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे सादरकर्ते सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांचेही विविध पैलू या नाटकाद्वारे प्रेक्षकांसमोर उलगडतात.

Comments
Add Comment