नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून बरेच निर्बंध हटवण्यात आले आहेत. असं असताना देशात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या व्हेरिएंटमुळे चौथी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा डेल्टाक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आढळला आहे. तो ओमिक्राॅन आणि डेल्टा एकत्र येऊन तयार झाला आहे. देशात त्यांचा संसर्ग सुरु झाला आहे. सध्या सात राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्या सर्वांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्ली या सात राज्यांमध्ये डेल्टाक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरली असताना डेल्टाक्रॉन व्हेरिएंटच्या रुपाने चौथी लाट तर येणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र डेल्टाक्रॉन किती घातक असू शकतो आणि त्याची लक्षणे कोणती हे पाहणे गरजेचे आहे. भोवळ आणि थकवा येणे ही दोन प्रमुख लक्षणे आहेत. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी ही लक्षणे दिसू लागतात. व्हेरिएंटचे रुग्ण कमी असल्याने तो किती गंभीर स्वरुप घेईल हे आताच सांगत येत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत घट नोंदवली होती. मात्र, शुक्रवारी राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यात काल, गुरुवारच्या तुलनेत, आज शुक्रवारी दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २७५ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले आहे. तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेत किंचित भर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे करोना लाट नियंत्रणात आल्याचे चित्र होते. मात्र, शुक्रवारी राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर, आरोग्य प्रशासन आणि राज्य सरकारच्या चिंतेत काहिशी भर पडली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कालच्या तुलनेत रुग्णवाढ नोंदवली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २७५ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याच कालावधीत ३४६ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिलासा देणारी एकमेव बाब म्हणजे, सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या खाली आहे. राज्यात ८९२ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७८,७३,२३१ इतकी आहे. तर आजपर्यंत राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७७,२४,५६० इतकी आहे. तर एकूण मृत्यूची संख्या १,४७,७७९ इतकी झाली आहे. आजपर्यंत एकूण ७,९१,५६,००२ नमुने तपासण्यात आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के इतके आहे. तर मृत्यूदर १.८७ टक्के आहे.
मुंबईत ३८ नवे रुग्ण तर एका रुग्णाचा मृत्यू
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या कमी होत असून, धारावी करोनामुक्त झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३८ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर ४७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर, एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आजपर्यंत १०,३७,९२६ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण २४८ आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर हा १९७९२ दिवसांवर पोहोचला आहे.