अरुण बेतकेकर
(माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना)
नरेंद्र मोदी २०१४ साली भारताचे पंतप्रधान झाले. त्याचवेळी त्यांनी आपली कारकीर्द ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी असेल हे जाहीर केले. संबंधितांनी या वाक्यास गांभीर्याने घेतले नाही. पंतप्रधान म्हणून मोदी स्थिरावत गेले आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराविरोधात पार्श्वभूमी तयार होत राहिली. यातून स्वकीयांसह सर्वांनाच संदेश पोहोचले. सुधारण्याची संधी दिली गेली. विरोधकांनी मात्र ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही,’ या म्हणीनुसार आपले कारनामे अबाधित सुरू ठेवले. केंद्रात मोदींच्या सत्तेस साधारण आठ वर्षे होत आली. दरम्यान अनेक राज्यांत भाजप विस्तारित होत गेली. केंद्र व भाजपाशासित राज्य यांच्यावर आजपावेतो भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. अलीकडेच फेब्रु.-मार्च २०२२ दरम्यान पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या. भाजप विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना विरोधकांना मात्र हे अस्त्र भाजपवर उलटवणे शक्य झाले नाही. यात उत्तर प्रदेशसारख्या अवाढव्य राज्यातही हे होऊ शकले नाही आणि भाजपने सदतीस वर्षांनंतर तेथे सलग दुसऱ्यांदा सत्तास्थापन करण्याचा बहुमान मिळवला. भ्रष्टाचार हा शिष्टाचार आणि यास राजाश्रय, अशा राज्यकारभारामुळे महाराष्ट्र ही यास अपवाद नसेल.
मी साधारण १९७६ साली शिवसैनिक झालो. कोणी गॉडफादर नसताना स्वकर्तत्वाने शिवसेनेत यशस्वी होत गेलो. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघासारख्या बलाढ्य संघटनेचा सरचिटणीस वगैरे झालो. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या विश्वासास उतरलो. त्यांच्या आतल्या गोटातील एक प्रमुख म्हणून प्रस्थापित झालो. सर्वसाधारण प्रतिमा राखत सन्मानास पात्र ठरलो. बाळासाहेबांच्या सोबत काम करत असताना शिवसेनेस योगदान, यास प्राधान्य होते, पण पुढे उद्धव ठाकरे यांच्या काळात ते अन्यत्र वळले. १००% समाजकारण, त्यानंतर ८०% समाजकारण आणि २०% राजकारण आणि आता १००% अर्थकारण + राजकारण आणि जमल्यास समाजकारण, अशा अधोगतीकडे शिवसेनेचा प्रवास सुरू आहे. अशाच विचारांचे लोकही एकत्र येत गेले. लोकाधिकार महासंघ ही शिवसेनेशी संलग्न बलाढ्य संघटना. असंख्य सरकारी, निमसरकारी व खासगी आस्थापनात विस्तारीत झाली होती. बाळासाहेबांनी मांडलेल्या ध्येयधोरणानुसार, मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी, नोकरी, बढती, बदली यात त्यांना प्राधान्य यासाठी यशस्वीरीत्या कार्यरत होती. असे असूनही तुमच्याकडून शिवसेनेस कोणताही आर्थिक लाभ नाही, असा सवाल कालांतराने मला करण्यात येऊ लागला. भारतीय कामगार सेना जर हे करू शकते, तर तुम्हास का जमत नाही, अशी तुलना होऊ लागली. मला सेंटॉर हॉटेलची सहारा समूहास विक्री, आयसीआयसीआय बँकेत बँक ऑफ मदुराईचे विलीनीकरण व तेथील कर्मचाऱ्यांच्या समस्या, इंडियन एअर लाइन्स येथील कर्मचारी संघटना, चेंबूर येथील मेहुल गावातील भारतीय तेल कंपन्यांच्या परिसरात बेकायदेशीर इमारती, अशी असंख्य कामांची उदाहरणे देता येतील. ज्यात अपेक्षित कारनाम्यात सहभागी होण्यास मी ठामपणे विरोध केला. त्यास एकमेव कारण होते, त्यातून होणारी मराठी माणसाची फसवणूक. माझ्या या म्हणण्यापृष्ठर्थ एक – दोन उदाहरणे इथे देत आहे.
४ फेब्रुवारी २००५ रोजी महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या दापोलीस्थित १५० एकरात पसरलेल्या आलिशान फार्महाऊसवर महासंघ व विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित केले होते. त्या रात्री जेवणादरम्यान अनेक महासंघ पदाधिकाऱ्यांसमक्ष गजाभाऊ म्हणाले, ‘‘अरे बेतकेकर, तुझ्यावर उद्धवजी नाराज आहेत, मला सातत्याने समजावण्यास सांगतात. का तू असा वागतोस? त्यांनी सांगितलेल्या कामास तू नाही कसा म्हणू शकतोस? पदाधिकारी म्हणून तुझे शिवसेनेसाठी उच्चप्रतीचे योगदान असते. शिवसेनेला तुझी आवश्यकता आहे. पण थोड्या तडजोडी कराव्या लागतात. त्यातूनच तुझे भवितव्य उज्ज्वल होईल.’’ मी म्हणालो, ‘‘कामाविषयी तक्रार नाही ना? मी नकार देतो ते शिवसेनेच्या मुळाशी येणाऱ्या कारणास्तव. उद्धवजींना भेटून मी माझी बाजू मांडेन’’ असे म्हणत मी विषय संपवला होता. ‘‘काही गोष्टी मला मनस्वी पटत नाहीत, त्यात मला तडजोड करणे शक्य होत नाही. मी आहे तसा मला स्वीकारावे’’, असे उद्धवजींना भेटून मी हात जोडून म्हणालो होतो, यशवंत जाधव यांच्याकडे १३० कोटींची मालमत्ता. बरं, बिचाऱ्या सामान्य गोरगरीब शिवसैनिकांचे काय? ईडी, आयटी, सीबीआय आज उद्धवजी आपल्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. ‘‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा.’’ सरकारच्या काळात हे चालणार नाही. अशात भाजपसोबत युती करत मोदींच्या नावे मते मिळवणार आणि त्यांच्याशीच बेईमानी करून दोघांचेही परंपरागत हाडवैरी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी संगत करत सत्तेवर विराजमान होणार, ही कृती दुर्लक्षित करण्याइतकी क्षुल्लक निश्चितच नाही. हेच या उलट घडले असते, तर भ्रष्टाचारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मूग गिळून गप्प राहिली असती. पण आता तसे होणे नाही. आपण जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीने भिडण्याचे ठरविले. या आव्हानास प्रतिआव्हान देत शड्डू ठोकलात. शिवसेना भवनात अभूतपूर्व पत्रकार परिषद घेऊन भीमदेवी थाटात अशी घोषणा केलीत, ‘‘बाप-बेटा जेल जायेंगे’’ म्हणजे कोण, राणे की सोमय्या? का आपल्या मनात सत्तेत अग्रगण्य असलेले बाप-बेटे? फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, महाजन वगैरेंना घेरण्याचे प्रयत्न आपल्या अखत्यारीतील राज्यसत्तेद्वारा केले. पदरी काही पडताना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करता. लढा अथवा लढता-लढता मरा. त्याकाळी पाठीवर जखमा घेऊन परतणाऱ्यांना जनता पळपुटे म्हणून झिडकारत असे. तत्पूर्वीच असे करणे आपणास झेपेल का? याचा विचार होऊ द्या.