ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईला दोन दिवस उलटत नाहीत, तोच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेला आणखी एक धक्का दिला. एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली. यामध्ये सरनाईक यांची हिरानंदानी येथील सदनिका आणि मिरा रोड येथील जमिनीचा समावेश आहे.
अभिनेत्री कंगना राणावत व अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंग मांडल्यानंतर गेल्या वर्षी प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ची पहिली कारवाई झाली होती. केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागल्यामुळे मध्यंतरी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर बराच काळ तपास थंडावला होता; मात्र आता सरनाईक पुन्हा एकदा ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. ‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार, एनएसईएल घोटाळा प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर जप्तीची ही कारवाई काही दिवसांपूर्वी करण्यात आली. एनएसईएल कंपनीतून सरनाईक यांच्या ‘विहंग’ आणि ‘आस्था’ या कंपन्यांमध्ये पैसे आले होते. त्यासाठी खोट्या बिलांचा वापर झाला होता. त्यामुळेच ‘ईडी’ने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते; परंतु सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दिलासा मिळवला होता. त्यामुळे ‘ईडी’ला सरनाईक यांची फारशी चौकशी करता आली नव्हती. आता अचानक सरनाईक यांच्या ११ कोटी ३५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणत ईडीने धडक कारवाई केली. त्यामुळे शिवसेनेसह आघाडी सरकार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ३० सप्टेंबर २०१३ रोजी एनएसईएल घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एनएसईएलच्या सदस्यांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवले आणि कर्ज फेडण्यासाठीही वापरले, असे चौकशीत समोर आले होते. या प्रकरणात १३ हजार गुंतवणूकदारांना ५ हजार ६०० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. दरम्यान, आस्था ग्रुपने एनएसईएलकडून २४२.६६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील २१.७४ कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्ट्स एलएलपी कंपनीत वळवले. या कंपनीला मिळालेल्या रकमेपैकी ११.३५ कोटी रुपये विहंग एंटरप्रायझेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या दोन कंपन्यांत वळवण्यात आले. या दोन्ही कंपन्या सरनाईक कुटुंबीयांच्या मालकीच्या आहेत. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत एकूण तीन हजार २५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील राजकीय भांडणात मला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे ही कारवाई होत असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले. गेल्या आठवड्यात हिरानंदानी येथील निवासस्थान आणि मिरा रोड येथील जमीन अशा दोन मालमत्ता जप्त केल्यानंतर ईडीने सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करत आहोत. तसेच आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून या नोटिशीविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सरनाईक म्हणाले. तसेच न्यायालय जो निर्णय देईल, त्यानुसार पुढील निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.