मुंबई : देशभरात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केले होते. मोदींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगत बुधवारपासून काँग्रेसतर्फे भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही उद्यापासून ‘महाराष्ट्राची माफी मागावी’ असे फलक घेऊन उभे राहणार आहोत, असे पटोले म्हणाले.
LIVE: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद https://t.co/U820AkIyVC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) February 8, 2022
पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती देशाची असते, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाल्याने मनाला तीव्र दुःख झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानपदावर बसलेले व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत असल्याचे सांगत, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, भाजपने आणि पंतप्रधानांनी याबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होते तेव्हा विरोधकांच्या आरोपांचे खंडन करून सरकारने काय केले हे सांगायचे असते. एकमेकांची खिल्ली उडवायची नसते. तातडीने लॉकडाऊन लावला तेव्हा हजारो लोकं चालत गेले, यात अनेकांचा जीव गेला. भाजपचे राज्यातील नेते पंतप्रधानांच्या वक्तव्याचे समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्र द्रोही असल्याचे पटोले म्हणाले.