मुंबई : काँग्रेसतर्फे भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर बुधवारपासून ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसला पंतप्रधान मोदींच्याविरोधात आंदोलन करायचे असेल तर करु दे. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र, काँग्रेस अंगावर आल्यास भाजप त्यांना शिंगावर घेण्यास तयार असल्याचे आव्हान भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी दिले आहे.
यावेळी आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. सुप्रिया सुळे यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांच्या डोक्यात एक राजकारण आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष कोरोनाचे सुपर स्प्रेडर आहेत. मुंबईत आपण ते पाहिले आहे, असे शेलार यांनी म्हटले.
दरम्यान, संजय राऊत यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वाळीत टाकले आहे. त्यामुळे आता संजय राऊत एकटे पडले असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली. महाविकास आघाडीच्या दृष्टीने संजय राऊत यांची उपयुक्तता संपलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने त्यांना टाकून दिले आहे. परिणामी संजय राऊत हे एकलकोंडे आणि एकटे पडल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले.