ठाणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारपणामुळे बराच काळ घरातून बाहेर पडत नसल्यामुळे कायम विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यातच आता ठाणे शहरात लागलेल्या बॅनर्समुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जर्जेला उधाण आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्रीपदाचा कारभार खरेच एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवायचा विचार करत आहेत का, याविषयीच्या तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत खरोखरीच खांदेपालट होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव सगळ्यात पुढे होते; परंतु ऐनवेळी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे या स्पर्धेतून बाहेर पडले. मात्र ठाण्यातील बॅनर्समुळे आता पुन्हा एकदा नवी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस असून त्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स झळकले. या पोस्टरमध्ये शिंदेंच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी हे पोस्टर्स लावले आहेत; परंतु एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख अनेकांच्या नजरेत भरणार आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी अजूनही कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी ते तब्बल अडीच महिन्यांनंतर घरातून बाहेर पडले होते व रविवारी ते लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कमध्येही आले होते. तरीही ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज काही काळासाठी शिवसेनेतील दुसऱ्या नेत्याकडे द्यावा, अशी मागणी भाजपकडून होत आहे; परंतु मुख्यमंत्रीपदाचा कारभार उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
‘तो’ उल्लेख नंतर पुसण्यातही आला…
दरम्यान, सर्वत्र चर्चा झाल्यावर तातडीने या बॅनरवरील ‘भावी मुख्यमंत्री’ हा उल्लेख पुसून टाकण्यात आला.
प्रकृतीच्या कुरबुरी
मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात १२ नोव्हेंबरला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २ डिसेंबरला उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तेव्हापासून उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसूनच राज्याचा कारभार चालवत आहेत. या काळात सर्व प्रशासकीय चर्चा, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळाच्या बैठकांना ठाकरे हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच हजेरी लावत होते. गेल्याच महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनालाही ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बोलवलेल्या बैठकीलाही ठाकरे गैरहजर होते. इतका काळ मुख्यमंत्री दिसत नसल्याने विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली होती.