संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेसारख्या मित्र पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटणे स्वाभाविकच आहे. राहुलचे भाषण का झोंबले, अशी विचारणा काँग्रेस पक्षानेही केली नाही, पण शिवसेनेने जाहीरपणे केली.
शिवसेना काँग्रेसच्या किती आहारी गेली आहे व राहुल गांधींचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी किती लाचारी करीत आहे, हेच त्यातून दिसले. महाआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून शिवसेना काँग्रेसपुढे नतमस्तक झाली आहे. राहुल गांधी, प्रियंका वड्रा यांनी काहीही केले की, त्यांच्यावर प्रशंसेचा भडिमार शिवसेना करीत असते. राहुल गांधी व काँग्रेसच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असा संदेश शिवसेना गेली दोन वर्षे देत आहे. आमच्या मुख्यमंत्रीपदाला धोका पोहोचू नये, यासाठी शिवसेना गांधी परिवाराच्या वारंवार आरत्या ओवाळत आहे. संसदेतील विरोधी पक्ष म्हणून केंद्राच्या कारभारावर राहुल गांधी यांनी केलेली टीका हे समजू शकते. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली असून ८४ टक्के जनतेचे उत्पन्न घटले आहे, यूपीएच्या काळात २७ कोटी गरिबांचे जीवनमान उंचावले होते, पण मोदी सरकारच्या काळात २३ कोटी लोक पुन्हा गरिबीच्या खाईत ढकलले गेले आहेत, असा आरोप राहुल यांनी केला. काँग्रेसला व राहुल गांधींना देशाच्या राजकारणात सर्वात मोठी भीती वाटते ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची. मोदींचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाल्यापासून सर्वात जास्त फटका काँग्रेसला बसला. काँग्रेसची मक्तेदारी संपुष्टात तर आलीच, पण काँग्रेस कमालीची संकुचित झाली. काँग्रेसचा सर्वात जास्त राग हा भाजपवर आणि त्यातही मोदी-शहांवर आहे हे सर्व देशाला ठाऊक आहे. त्यामुळे संसदेत व संसदेबाहेर कितीही घसा ताणून राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्ले चढवले तरी त्याचा परिणाम जनतेवर होत नाही. राहुल यांना देशात कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांचे भाषण कुणाला झोंबले असण्याची सुतराम शक्यता नाही.
राहुल गांधी यांना मोदी लाटेत त्यांच्या परंपरागत अमेठी लोकसभा मतदारसंघातही जनतेने नाकारले याचा अर्थ त्यांच्या समर्थकांना व त्यांचे गुणगान करणाऱ्यांना अजून समजलेला नाही. राहुल गांधी संसदेत येतात बोलतात आणि निघून जातात, राहुल गांधी जाहीर सभेला येतात, बोलतात व निघून जातात, त्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांशी कधी संवाद होत नाही. पक्षाच्या नेत्यांशी तरी त्यांचा कुठे नियमित संवाद असतो? केवळ हाताच्या बाह्या सावरत आणि घसा फोडून मोदी सरकारवर वाट्टेल तसे आरोप केले म्हणजे काँग्रेसची लोकप्रियता वाढेल, असे त्यांना वाटत असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सहा-सात दशके विविध राज्यात व केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसच्या कारकिर्दीत नवे संस्थानिक व भाई दादा निर्माण झाले. काँग्रेसच्या काळातच देशभर भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण झाली. काँग्रेस सत्तेवरून हटवणे हे त्या काळात कोणत्याच एका पक्षाला जमले नाही. पण, मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ते करून दाखवले. २०१४मध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेसला पर्याय देशात उभा राहिला व जनतेने भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत दिले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिनशेपेक्षा जास्त खासदार निवडून आले, हा काँग्रेसला मोठा शॉक होता, त्या धक्क्यातून काँग्रेस अजून सारवलेली नाही. आपल्या घराण्याची पुण्याई सांगून मते मागण्याचे दिवस संपले हे मोदींनी दाखवून दिले. जो काम करील, जो पारदर्शक कारभार करील, जो विकासाच्या मुद्यावर मते मागेल, त्याच्या पाठीशी जनता उभी राहते, हे गेल्या दोन लोकसभा निवडणुकींनी दाखवून दिले. पण, काँग्रेसची सूत्र आपल्या हाती पकडून ठेवणाऱ्या गांधी परिवाराच्या अजून ते लक्षात येत नाही.
आपले पणजोबा देशासाठी पंधरा वर्षे तुरुंगात होते, आपल्या आजीने इंदिरा गांधींनी देशासाठी शरीरावर ३५ गोळ्या झेलल्या, आपले वडिल राजीव गांधी हे सुद्धा देशासाठी हुतात्मा झाले, तुम्ही काय देश शिकवता?, मला माझा देश चांगला माहीत आहे, असे राहुल गांधी यांनी संसदेत म्हटले. पंडित नेहरू, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांनी देशासाठी समर्पण केले, पण या पुण्याईवर राहुल गांधी किती काळ मते मागणार आहेत. त्यांचे स्वत:चे काय कार्यकर्तृत्व आहे, हे त्यांनी सांगावे किंवा दाखवून द्यावे. भारताच्या सरहद्दीवरील घटनांमधे चीन पाकिस्तानचा सहभाग असलेल्या घटनांबद्दल मोदी सरकारला जाब विचारणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे. कोविड काळात मोदी सरकारने देशात जे काम केले, त्याला तोड नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांना केंद्राने औषधोपचारापासून अन्नधान्यापर्यंत सर्वतोपरी मदत केली. कोविड काळात केंद्राने जवळपास पंधरा लाख कोटी खर्च केले. भारतासारख्या अवाढव्य देशात लसीकरण मोहीम राबवून शंभर कोटींपेक्षा जास्त लोकांना लस दिली, हा तर जागतिक विक्रम होता, त्याबद्दल सरकारला धन्यवाद द्यायचे सोडून आपल्या घराण्याने देशासाठी किती त्याग केला, याचीच माळ राहुल गांधी ओढत राहिले. यूपीएच्या काळात किती लोकांना गरिबीतून वर काढले, याचे निश्चित आकडेच राहुल यांना ठाऊक नसावेत. कधी १४ कोटी, कधी १५ कोटी, कधी २३, तर कधी २७ कोटी असे सांगतात. त्यांची हेच वेगवेगळे आकडे सांगणारी भाषणे सोशल मीडियावर टिंगल टवाळीचा विषय बनली आहेत. तरीही शिवसेना त्यांचे गोडवे गात आहे.