भारतीय समाजमनावर सिनेमाजगताचे फार मोठे अधिराज्य असते. किंबहुना भारतीय नागरिक हा चित्रपटांमध्ये आपले आयुष्य पहात असतो किंवा बहुतेकदा चित्रपटांतील नायक – नायिकांना पहात त्यांचे अनुकरण करीत असतो. त्यामुळेच चांगले चित्रपट आणि चांगल्या नटांचा जीवंत अभिनय या गोष्टी सामन्यजनांना भारावून टाकतात आणि त्या अभिनेत्याला ते आपला आदर्श मानू लागतात. त्यामुळेच आदर्श ठरलेले हे गुणीजन जेव्हा हे जग सोडून जातात तेव्हा अनेकांच्या भावविश्वात एक पोकळी निर्माण करून जातात. असेच काहिसे आता सिनेरसिकांचे झाले आहे. मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनानंतर रसिकमन सुन्न झाले आहे. रमेश देव या मराठमोळ्या राजबिंडा नायकाने कृष्ण-धवल चित्रपटांपासून ते रंगीत चित्रपटांपटांपर्यंत अनेक दशके आणि कित्येक पिढ्यांतील रसिकांवर गारूड केले. मराठी -हिंदी सिनेसृष्टीत देव यांची ख्याती मोठी होती. अमिताभ,राजेश खन्ना यांसारख्या सुपरस्टार्सच्या सुरुवातीच्या काळात रमेश-सीमा देव या मराठमोळ्या जोडीने त्यांच्यासोबत तोडीसतोड काम केले. आज वयाची नव्वदी पार केल्यानंतरही रमेश देव हे अनेक कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित रहायचे व आनंदाने त्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचे. काही दिवसांपूर्वीच अशाच एका कार्यक्रमात त्यांनी मी वयाची शंभरी गाठेन असे म्हटले होते. पण त्यांच्या या अचानक जाण्याने चाहत्यांना मात्र शोक अनावर झाला आहे. खरे तर दिनकर द. पाटील यांच्या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम राम पाव्हणं’या चित्रपटात पहिल्यांदा रमेश देव पडद्यावर झळकणार होते. परंतु त्यांची ही भूमिका एडिटिंगमध्ये कापली गेली. मात्र श्रेय नामावलीत त्यांचे नाव कायम राहिले. याचाच अर्थ ते चित्रपटात दिसले नसले तरी श्रेय नामावलीतून पडद्यावर मात्र चमकले. यानंतर रमेश देव यांनी ‘शारदा’,‘छत्रपती शिवाजी’,‘माय बहिणी’‘मुकं लेकरू’,‘महाराणी येसूबाई’,‘कुलदैवत’ आदी चित्रपटांत भूमिका करत राहिले. पण जम बसत नव्हता. पण ते नशिबवान आहेत किंवा एखाद्याचे नशिब ते कसं फुलवतात याचा एक मजेशीर किस्सा आहे. रमेश देव यांना घोड्यांच्या ‘रेस’ मधील ओ की ठो कळत नव्हते. पण त्यांनी अंदाजाने एका घोड्यावर बोट ठेवले व राजा परांजपे यांनी त्यावेळी त्या घोड्यावर पैसे लावले व आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो घोडा ती शर्यत जिंकला. त्या काळात राजा परांजपे यांना तब्बल अठरा हजार रुपये मिळाले. खरं म्हणजे १९५५ मध्ये ती रक्कम फार मोठी होती. तेव्हापासून परांजपे यांना रमेश देव हे खूप ‘लकी’ वाटत. त्यांनी सहज त्यांना प्रश्न विचारला, ‘तू सध्या काय करतोस?’ तेव्हा ‘मी पोलीस भरतीला चाललो आहे आहे’, असे उत्तर रमेश देव यांनी दिले होते. तेव्हा राजा परांजपे तत्काळ म्हणाले, ‘पोलिसभरती वगैरे सगळं विसर. माझ्या नव्या चित्रपटात तू खलनायक म्हणून काम करणार आहेस’. हा चित्रपट होता ‘आंधळा मागतो एक डोळा’. या चित्रपटात रमेश देव यांची पहिली मोठी भूमिका होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. पुढे राजा परांजपे आणि रमेश देव यांची जोडी मस्त जमली आणि अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट त्यांनी दिले आणि रमेश देव खऱ्या अर्थाने ‘लंबी रेस का घोडा’ ठरले.रमेश देव यांचा जन्म कोल्हापूर येथे ३० जानेवारी १९२९ रोजी झाला. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव ‘देव’ झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर ‘देव’ आहात, तेव्हापासून ‘देव’ हे नाव रूढ झाले आणि सिनेजगतातील देवमाणूस म्हणून ते ओळखले जाऊ लागले. ‘आलिया भोगाशी’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै १९५३ ला त्यांचा विवाह झाला.रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती. रमेश देवांचे मराठी चित्रपटसृष्टीत फार मोठे योगदान आहे. एक काळ तर असा होता, की रमेश देव आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री निर्माता – दिग्दर्शकासह सर्वांनाच असायची.इंडस्ट्रीत वेळ पाळणारा नट म्हणूनच रमेश देव यांचे नाव घेतले जात असे. रमेश देव यांनी अनेक चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या, पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत. ‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच ठरला. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले. तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न ठेवता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.रुपेरी पडद्यावर रमले असूनही देव यांनी मराठी रंगभूमीवरही तितकेच प्रेम केले. त्यासाठी ‘अजिंक्य थिएटर्स’ या नाट्यसंस्थेची स्थापना करून त्यांनी तुझे आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, अकुलिना, मवाली, लाल बंगली..आदी नाटकांचे शेकडो प्रयोग रंगवले. विशेष म्हणजे रमेश देव यांनी निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही आपला ठसा उमटवला. त्यांचा ‘सर्जा’ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला. अनेक हिंदी चित्रपटांतही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’या प्रचंड गाजलेल्या चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र रमेश देव यांनी खरोखरीच मनापासून रंगवला व ते डॉक्टरच्या रुपात शोभूनही दिसले. त्यांच्या या भूमिकेला खूप मोठी दादही मिळाली. अभिनेता म्हणून प्रस्थापित होवून रमेश देव यांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले. नव्वदीतही तरुणांना लाजवेल असा अमाप उत्साह त्यांच्यात भरूलेला होता आणि शेवटपर्यंत कलाकार म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा दिसत होती. १९५१ साली आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरुवात केलेल्या रमेश देव यांनी अभिनयातील खूप लॉंग इनिंग खेळली. आता-आतापर्यंत ते अभिनय क्षेत्रात सक्रिय होते. दोन-तीन वर्षापूर्वी म्हणजे वयाच्या नव्वदीत त्यांनी एका मराठी मालिकेत काम केले होते. सदाबहार अभिनयाचा मानबिंदू तर होतेच पण आजच्या कलाकरांसाठी ते अष्टपैलू अभिनयाचे विद्यापीठच होते असे म्हटले तर वावगे ठरू नये.
सदाबहार अभिनयाचा मानबिंदू
