आशा काळे, प्रसिद्ध अभिनेत्री
ज्येष्ठ अभिनेता रमेश देव यांचं निधन ही अत्यंत दु:खद बातमी आहे. त्यांच्याबरोबर एका भव्य-दिव्य कारकिर्दीचा अस्त झाला आहे. ‘अतिशय लव्हेबल व्यक्ती’ इतक्या अत्यल्प शब्दांत रमेशजींच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करता येईल. अलीकडेच ‘झी’कडून जीवनगौरव पुरस्कार घेताना तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारण्याऐवजी सीमा देव या माझ्या अत्यंत लाडक्या अभिनेत्रीच्या हस्ते मिळाला, तर अधिक आवडेल, असं मी सांगितलं होतं. ‘झी’ने देखील माझ्या या इच्छेचा मान राखला. सीमाजींकडून पुरस्कृत होण्याच्या त्याप्रसंगी रमेश देव आवर्जून हजर राहिले होते तसंच त्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. रमेशजींनी मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट छाप उमटवली आहे. ‘गहिरे रंग’ या नाटकात देव दाम्पत्याबरोबर मी काम केलं होतं. त्यात ते नायक-नायिकेच्या भूमिकेत होते. यानिमित्ताने मला त्यांचा निकटचा सहवास मिळाला. त्यावेळी ते जुहूला ‘मेघदूत’मध्ये राहायचे. तिथे मी वारंवार जात असे. बरेचदा बरोबर माझी आई असायची. आईशी तर ते दोघे अत्यंत प्रेमाने बोलायचे. तिला आपल्या आईसमान वागवायचे.
मी मूळची कोल्हापूरची. देव दाम्पत्याला मी कोल्हापूरमध्ये प्रथम पाहिलं ते शाळकरी वयात असताना. त्यावेळी जयप्रभा स्टुडिओमध्ये त्यांच्या ‘सुवासिनी’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. त्याचे असिस्टंट डायरेक्टर मधुकाका कुलकर्णी माझ्या वडिलांचे परिचित होते. ते आम्हाला चित्रीकरण बघायला घेऊन जायचे. त्यावेळी सेटवर मी प्रथम त्या दोघांना पाहिलं. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल, असे त्यावेळी अजिबात वाटलं नव्हतं. पण पुढे ही संधी मिळाली आणि त्यांच्या दिलखुलास वृत्तीचा, व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचय झाला. इतकी प्रसिद्धी, पैसा, मान मिळवूनही शेवटपर्यंत निरलस राहिलेलं ते व्यक्तिमत्त्व होतं. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रसृष्टी, रंगभूमीदेखील गाजवली. त्या दोघांबरोबर काम करणं हा सुखद अनुभव असे. पती-पत्नी म्हणून त्या दोघांचे संबंधही वाखाणण्याजोगे होते. त्यातही सीमाताई अधिक चोख. अभिनय, नाटकाचे डायलॉग पाठ करणं या सगळ्यातच त्यांना विलक्षण गती होती. दिलखुलास रमेशजी मात्र बरेचदा नाटकातले संवाद विसरायचे. त्यांचं संहितेकडे दुर्लक्ष व्हायचं. काम जबरदस्त असलं तरी इतर व्यापात नाटकाची नक्कल पाठ करण्यात ते मागे पडायचे. अशा वेळी सीमाताई त्यांच्याकडून पाठांतर करून घ्यायच्या. ‘नाही रमेश, तो संवाद तसा नाही, असा आहे…’ असं त्यांच्यातलं संभाषण मी अनेकदा ऐकलं आहे.
‘गहिरे रंग’ या नाटकाच्या वेळची ही आठवण आहे. या नाटकात नायिका तुरुंगात असते. त्यात एका दृष्यामध्ये सीमा आणि रमेश यांच्यात एक संवाद होता, ‘किती वर्षं मी तुरुंगात काढायची? १४ वर्षं…! १४ महिने…! १४ उन्हाळे…! १४ पावसाळे…’ हा संवाद म्हणताना रमेशजी दर खेपेला वेगवेगळे आकडे म्हणायचे. कधी १६ महिने, कधी १२ महिने, कधी दहा महिने… अशी चूक करायचे. त्यामुळेच सीन संपवून आत आल्यावर सीमाजी मला म्हणायच्या, ‘अगं आशा, आज माझी शिक्षा दोन वर्षांनी वाढली गं…!’ त्यांनी ‘१२ वर्षं’ या आकड्यानिशी संवाद म्हटला, तर त्या म्हणायच्या, ‘आज त्यानं शिक्षेची दोन वर्षं कमी केली.’ अशी सगळी गंमत चालायची… नाटकाच्या दौऱ्यावर जायचो तेव्हा आम्ही सगळे एकत्र राहायचो. त्या निमित्तानेही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळायचं. या नाटकात माझी एका भाबड्या मुलीची भूमिका होती. यातला माझा गेट-अप ‘गुड्डी’मधल्या जया भादुरीच्या गेटअपसारखा होता. ही मुलगी शालेय अभ्यासात मागे होती. त्यामुळे ती एकेका इयत्तेत चार-पाच वर्षं काढत होती. अशी ही थोड्या विनोदी अंगाने जाणारी भूमिका साकारताना मला देव दाम्पत्याच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू अनुभवायला मिळाला. नाटकातली माझी ‘दुर्गी’ची व्यक्तिरेखा त्यांना इतकी आवडायची की, आपला प्रवेश संपल्यानंतर मेक-अप रूममध्ये न जाता ते माझा अभिनय पाहण्यासाठी विंगेत थांबायचे.
तुम्हाला माझा कोणता सीन आवडतो, असं मी एकदा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘ते आम्ही सांगणार नाही. कारण यामुळे तू तोच विचार करशील आणि अभिनयातली सहजता हरवून बसशील.’ माझ्या अभिनयात कृत्रिमता येण्याचा धोका लक्षात घेऊन त्यांनी कधीच मला त्यांचा आवडता सीन सांगितला नाही. दुसऱ्याचा इतका विचार करणारे अभिनेते आता दिसतील का? सीमाताईंकडून मी अभिनयातले बारकावे शिकले. पण कसं जगावं, अडचणींना कसं तोंड द्यावं, हे मी रमेशजींकडून शिकले. रमेश देव आपल्याला सोडून गेले. वय वाढलं की वयाचे आकडे वाढतात आणि एक दिवस निसर्ग आपलं काम करतो. पण रमेशजींच्या मनाला कधीच वाढत्या वयाचा स्पर्श झाला नाही. तो माणूस चिरतरुण होता. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीच ढळलं नाही. त्यांनी कधीच कोणाला कमी लेखलं नाही. मेहनतीने यश मिळवणाऱ्या रमेशजींनी कधीही यशाचा अभिमान मिरवला नाही. मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम करणाऱ्या रमेशजींचे पाय कायम मातीचेच राहिले. मुख्य म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी वृत्तीतली ही सकारात्मकता आणि शरीर-मनाचं आरोग्य जपलं. अखेरपर्यंत ते मनमोकळं बोलत होते. सीमाताईंना सध्या विस्मरणाचा त्रास आहे. मात्र रमेशजी अखेरपर्यंत गप्पांमध्ये हरवलेले असायचे.
रमेशजींच्या अभिनयात एक प्रकारची सहजता होती. चित्रपटात आधी कलाकाराचा चेहरा बोलला पाहिजे आणि मग संवाद आले पाहिजेत. रमेशजींमध्ये हे नेमकेपणानं दिसायचं. कारण प्रत्येक भूमिकेसाठी ते अपार मेहनत घ्यायचे. ‘वेगळं व्हायचंय मला’ हे त्यांचं नाटकंही खूप गाजलं. बाळ कोल्हटकर, राजा परांजपे, राजा नेने असे ख्यातनाम चेहरे त्यात होते. या नाटकाचेही अनेक दौरे झाले. या वेळची एक आठवण संस्मरणीय आहे. या नाटकाच्या तालमी मुंबईला बिर्ला क्रीडा हाऊसमध्ये व्हायच्या. आम्ही सगळे कलाकार तिथे जमायचो. त्यावेळी सीमाताईंची मुलं लहान होती. एकदा ११-१२ वर्षांचा अजिंक्य तालमीला आला होता. आमचं काम सुरू झाल्यावर तो बोट हाऊसच्या आजूबाजूला खेळू लागला. बाहेर बिर्ला शेठचा उंच पुतळा होता. खेळता खेळता तो त्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढला आणि जवळपास मध्यापर्यंत गेला. तो कुठे दिसत नाही, हे लक्षात येताच इकडे सीमा आणि रमेशजी काम सोडून त्याला शोधायला बाहेर पडले. त्यांच्याबरोबर आम्हीही बाहेर आलो. बाहेर बघतो तो लहानगा अजिंक्य चौथऱ्यावर चढलेला दिसला. त्याबरोबर सीमा घाबरल्या आणि त्याला हाका मारून खाली बोलावू लागल्या. तेवढ्यात रमेशजींनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, ‘नलू, गडबड करू नकोस. (रमेशजी सीमा देव यांना ‘नलू’ अशी हाक मारायचे.) त्याला बिचकवू नकोस.’ असं म्हणत ते अजिंक्यला म्हणाले, सावकाश वर चढ आणि त्यांच्या पायाला नमस्कार करून खाली ये. अर्ध्यातून खाली यायचं नाही. हे बोलतानाचा त्यांचा करारी चेहरा मला अजूनही आठवतो. ते रमेशजी मला अधिक भावले. त्यांच्यातल्या खंबीर पित्यानं आपल्या मुलाला अर्ध्या वाटेतून परतवलं नाही, तर नेहमी पुढेच जाण्याची शिकवण दिली. त्यामुळेच त्यांची दोन्ही मुलं या क्षेत्रात वेगळी ओळख टिकवून आहेत. रमेशजींना विनम्र आदरांजली. त्यांच्या अशा अनंत आठवणी सतत बरोबर राहतील.
(शब्दांकन : स्वाती पेशवे)