Monday, April 28, 2025
Homeमहत्वाची बातमीमहाराष्ट्र पोरका झाला - मान्यवरांनी वाहिली सिंधुताईंना श्रद्धांजली

महाराष्ट्र पोरका झाला – मान्यवरांनी वाहिली सिंधुताईंना श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात ह्रदय विकाराच्या झटक्यानंतर निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर सर्वच क्षेत्रातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

वात्सल्यमूर्ती सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली : राज्यपाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्री

‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही. पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरावयाचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेला दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.

त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाजजीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र एका मातेला मुकला : देवेंद्र फडणवीस

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शोक व्यक्त केला.

सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा देताना आपल्या भावना व्यक्त करीत ट्वीटरद्वारे फडणवीस म्हणाले, “

वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.

ममता बालसदनच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथांना आश्रय दिला. मी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्या भेटायला येत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचे समाधान. पण प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या, हे अधिक स्मरणात आहे. त्यांच्या जाण्याने मनाला अतिशय वेदना होत आहेत.

पद्मश्री पुरस्कार, अनेक कामे आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कायम स्मरणात रहावे, असा त्यांचा कनवाळू स्वभाव, मायेने डोक्यावर हात फिरवणे, ममतेने भरभरून आशीर्वाद देणे. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे.सिंधुताई सपकाळ यांना माझी विनम्र श्रद्धांजली! महाराष्ट्राच्या दुःखात मी सहभागी आहे.ॐ शांती.”

सिंधूताई सपकाळ यांचे समाजाप्रती योगदान खूप मोठे : नितीन गडकरी

सिंधूताई सपकाळ यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी तीव्र शोक व्यक्त केला.

ट्वीटरद्वारे नितीन गडकरी म्हणाले, ” ज्येष्ठ समाजसेविका व ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधूताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला. समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती. “

सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, सिंधुताई सपकाळ यांनी समाजातल्या हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले, त्यांना मायेची सावली दिली. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत, त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आयुष्यभर संघर्ष, कष्ट करत त्यांनी सामाजिक कामाचा वसा जपला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सिंधुताईंचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक – गृहमंत्री वळसे-पाटील

निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील, अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

सिंधुताईंच्या निधनामुळे सेवाव्रती, समर्पित व्यक्तिमत्त्व गमावले – अशोक चव्हाण

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताईंनी खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना मायेचा आधार दिला. अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

निस्वार्थ समाजसेवेचे उत्तम उदाहरण म्हणजे माई – सुधीर मुनगंटीवार

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या माई अर्थात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले, अशी शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

सिंधुताई सपकाळ मला प्रेरणा देत राहतील : अभिनेत्री तेजस्विनी पंडित

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी तीव्र शोक व्यक्त केला.

सिंधुताई सपकाळ यांच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा देताना फेसबुकद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत तेजस्विनी पंडित म्हणाल्या,

“अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस….पोस्ट नाही केलं?

पटकन गृहीत धरतो ना आपण त्यांच्या सामाजिक माध्यमांवरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सामाजिक माध्यमांवर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो?

माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोन वरुन बातमी अधिकृत झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते.

खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले….कारण ती वेळ खरंच नाजूक होती.

माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही….पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला….कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस !

“अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.

अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते , त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला.

आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी पडद्यावर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई.

महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.

लोकहो एक विनंती….घाई घाई ने आरआयपी लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे… त्यांना वेळ द्या.

तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना की माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.

ओम शांती. माई…- तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई “

मी सिंधुताई सपकाळ या जीवनपतात तेजस्विनी पंडित यांनी युवा सिंधुताई सपकाळ यांची भूमिका साकारली होती.

अनाथांची आभाळमाया हरपली – श्वेता परुळकर

अनाथांच्या पालनकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल मुंबई भाजपा उपाध्यक्षा श्वेता परुळकर यांनी शोक व्यक्त केला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित निधनाने हजारो अनाथांची माय काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रवास व अनाथांच्या प्रति असलेली माया संपूर्ण जगाने पाहिली आहे, अशा शब्दांत परुळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात अकस्मित दुःखद निधन झाले. अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करत अनाथ मुलांचा आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांनी सांभाळ केला. सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित निधनाने हजारो अनाथांची माय काळाच्या पडद्याआड गेली असून हजारो अनाथ लेकरांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले असून ती पुन्हा अनाथ झाली आहेत. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मुंबई भाजपा सिंधुताई सपकाळ यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असेही परुळकर म्हणाल्या.

अनाथांचं आधारवड कोसळलं – चित्रा वाघ

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनीही आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, अनाथांचं आधारवड कोसळलं. अनाथांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच निधन मनाला चटका लावणारं आहे. माईंनी घडवलेली मुलं हीच त्यांची खरी संपत्ती. महाराष्ट्राच्या मातीत अशा माई जन्मल्या हे आमचं भाग्य… भावपूर्ण श्रद्धांजली.

हजारो अनाथांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले – नाना पटोले

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकस्मित निधनाने हजारो अनाथांची माय काळाच्या पडद्याआड गेली आहे. हजारो अनाथांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले असून ती पुन्हा अनाथ झाली आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, हजारो अनाथांची माय असणा-या सिंधुताई सपकाळ यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत खडतर होते. अनेक कठिण प्रसंगांना सामोरे जात संघर्ष करत त्यांनी हजारो अनाथांना मातृछत्र दिले. अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करत अनाथ मुलांचा आपल्या पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांनी सांभाळ केला. त्यांच्या या महान कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन तर भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सिधुंताईच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे असे नाना पटोले म्हणाले.

तुम्हाला श्रद्धांजली कशी वाहु? – निलम गोऱ्हे, विधानपरिषदेच्या उपसभापती

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या, “प्रिय सिंधुताई , तुम्हाला श्रद्धांजली कशी वाहु? तुम्ही केलेल्या अनाथ मुलांचे काम चिरंतन आहे. खुप प्रतिकुल अनुभव येईनही तुम्ही चैतन्य व प्रेमाची स्नेहगंगा होता. भरल्या अंतःकरणाने तुमचा निरोप घेते. तुम्हाला अखेरचा नमस्कार.”

महाराष्ट्राची माई – यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, “महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले आहे. त्या ७३ वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाला आहे. स्वतःला घरातून हाकलून दिल्यानंतर आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडलेली सिंधुताई परिस्थितीवर मात करत आपल्यासारख्या पिचलेल्या महिलांची आणि अनेक अनाथ बालकांची आई झाली. माईच्या आश्रमात दीड हजारांहून अधिक मुलांनी मोकळया आभाळाखाली जगण्याचं शिक्षण घेतलं. आश्रमातील अनेक बालकांच्या पंखात बळ भरत माईने त्यांना समाजात मानाचं स्थान प्राप्त करून दिलं.”

“अनेक शासकीय उच्च पदस्थ अधिकारी याच्यापासून उद्योगपतींपर्यंत मायेच्या पंखाखाली मुलांनी भरारी घेतली. सिंधुताईंच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ९०० हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, तर केंद्र सरकारने त्यांना नुकताच मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं होतं. माईंच्या जाण्यामुळे अवघा महाराष्ट्र पोरका झालाय. मी माईंच्या मोठ्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे,” अशी भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नवाब मलिक (अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी), रुपाली चाकणकर (अध्यक्ष, राज्य महिला आयोग), नारायण राणे (केंद्रीय मंत्री), रोहित पवार (आमदार, राष्ट्रवादी), जयंत पाटील (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र), धनंजय मुंडे (सामाजिक न्यायमंत्री, महाराष्ट्र), खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस), विनोद तावडे (भाजपा), खासदार सुनिल तटकरे (राष्ट्रवादी) यांच्यासह अनेक राजकीय नेते, कलाकार आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -