मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी तुर्तास राज्यात लॉकडाऊन लागू करायचा नाही. त्याऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत टास्क फोर्सचे तज्ज्ञ आणि आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल तासभर चर्चा सुरु होती. या चर्चेअंती तुर्तास राज्यात लॉकडाऊन करण्याची गरज नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे. मात्र, लॉकडाऊनऐवजी कोरोना निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयावर सर्वांचे एकमत झाल्याची माहिती आहे. आता या बैठकीतील माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाईल. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची नियमावली जारी केली जाऊ शकते.
निर्बंधांमध्ये वाढ होणार असली तरी लॉकडाऊनचा पर्याय निकालात निघाल्याने राज्यातील नोकरदार, सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊन लावल्यास राज्याचे अर्थचक्र थांबू शकते. राज्य सरकार हा धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे सरकार अजूनही लॉकडाऊन न करण्यावर ठाम असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबईसह राज्यभरात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळाली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार, या चर्चांना ऊत आला होता. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १८ हजार ४६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर २० जणांचा मृ्त्यू झाला. यापूर्वी सोमवारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या तब्बल १२ हजार इतकी होती. मात्र, एकाच दिवसात नव्या कोरोना रुग्णांची संख्या आठ हजाराने वाढली आहे.
मुंबईत ओमायक्रॉनचा धडकी भरवणारा आकडा
मुंबईसह राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. आज राज्यात ७५ ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. एकट्या मुंबईतच ४० जणांना संसर्ग झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १० हजार ८६० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाचा डबलिंग रेट अवघ्या ११० दिवसांवर आला आहे. काल हाच डबलिंग रेट १८३ दिवसांचा होता. तर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर ०.६३ टक्के इतका आहे.
मुंबईत सध्या ४७ हजार ४७६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घसरुन ९२ टक्क्यांवर आले आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये ६५४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.