मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसमुक्त विरोधी पक्षांची आघाडी करण्याचा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्या उघड बोलतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आडमार्गाने बोलतात. काँग्रेसला बाजूला ठेवून विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न हे दोघे करत आहेत. काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यांच्यात कोण राहते ते पाहू. मग २०२४ मध्ये आमच्याबरोबर कोण लढेल ते पाहिले जाईल. सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न मागच्या निवडणुकीतही झाले. मात्र, लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. आता २०२४ मध्येही हेच होणार, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ममता बॅनर्जी उद्योजकांना भेटण्यासाठी नव्हे तर विरोधकांची मोट बांधण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. गोवा, ईशान्य भारतात तृणमूल काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्नशील आहे. काँग्रेस नाही तर आम्ही मुख्यच विरोधी पक्ष आहोत असे दाखवण्याचा तृणमूलचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत इतक्या मोठ्या बाता करतात, त्यांचे किती निवडून आले? फक्त ५६ आमदार निवडून आले. त्यांचा ४०-४२ टक्के असा पासिंग स्ट्राईकरेट होता. आमचा ७० टक्के होता. त्यामुळे कुणाला महाराष्ट्रातल्या लोकांनी पळवून लावले हे निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. पुढच्या निवडणुकीतही हे अधिक स्पष्ट होईल, असे फडणवीस म्हणाले.