Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेडम्पिंगच्या त्रासातून होणार दिवावासीयांची मुक्तता

डम्पिंगच्या त्रासातून होणार दिवावासीयांची मुक्तता

ठाणे (वार्ताहर) : ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवावासीयांची डम्पिंगच्या त्रासातून आता मुक्तता होणार आहे. येथील कचरा विल्हेवाटीसाठी भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली असून, दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. गुरुवारी जागा ताबा करारनाम्यावर महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आता दिवावासीयांची डम्पिंगच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. भंडार्ली येथील जागेवर लवकरच शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विघटन प्रकल्प सुरू होणार असल्याचे महापौर व आयुक्तांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

या पत्रकार परिषदेस उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी
पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सुनीता मुंडे, माजी उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, शैलेश पाटील, दीपक जाधव, अमर पाटील, दर्शना म्हात्रे, अंकिता पाटील, दीपाली भगत अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, घनकचरा विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर आदी उपस्थित होते.

भंडार्ली येथील जागा नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे तसेच येथे येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी महापालिका घेणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी विरोधाला विरोध न करता या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

महापालिकेच्या या स्वत:च्या जागेवर लवकरच कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबतचे काम येत्या दोन आठवड्यांत पूर्ण होणार आहे, तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शासनस्तरावरील सर्व परवानग्या मिळण्याकामी पूर्तता केली असून त्यास मंजुरी मिळेल व लवकरच हा प्रकल्प सुरू होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -