नितेश राणे यांचा प्रहार
मुंबई : वरळीतील बीडीडी चाळ येथील घरातील सिलिंडर स्फोटात गंभीररित्या जखमी रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू न केल्याची घटना नायर रुग्णालयात घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. नायर रुग्णालयात मंगळवारी सकाळी गंभीररित्या जखमी पुरुष आणि चार महिन्यांचे बाळ तासभर उपचाराविना विव्हळत होते. या बाळाचा बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला. यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
छोट्याशा चिमकुल्या बाळाने वेदनेने विव्हळत आपले प्राण सोडले, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, या कुटुंबाला दु:खातून सावरण्याचे बळ मिळो. आदित्य ठाकरे माणुसकी जपा. कारण आपल्या कर्माचा हिशोब इथेच चुकवावा लागतो, असे नितेश राणे म्हणाले आहेत. या बाबतचे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.